Thu, Jul 18, 2019 02:14होमपेज › Sangli › टेम्पो कारची धडक; जयसिंगपूरचे तिघे ठार

टेम्पो कारची धडक; जयसिंगपूरचे तिघे ठार

Published On: May 07 2018 2:04AM | Last Updated: May 07 2018 2:04AMकवठेमहांकाळ : प्रतिनिधी

जत-कवठेमहांकाळ मार्गावर कोकळे गावाजवळ कार आणि आयशर टेम्पोची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात जयसिंगपूर येथील तिघे जण जागीच ठार झाले, तर एक जण जखमी झाला. लखन भीमराव मोहिते, सुभाष मारुती चव्हाण आणि विशाल सदाशिव माळी (सर्व रा. जयसिंगपूर) अशी मृतांची नावे आहेत. सचिन मोहिते (रा. जयसिंगपूर) हा जखमी झाला आहे. रविवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास हा अपघात घडला. कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे.

जयसिंगपूर येथील मोहिते यांच्या कुटुंबातील सदस्य कारमधून (एमएच09- 9976) जत येथे नातेवाईकाच्या लग्‍न समारंभासाठी गेले होते. सायंकाळी ते जयसिंगपूरकडे जाण्यासाठी निघाले. गाडीमध्ये चौघे जण होते.

कोकळे (ता. कवठेमहांकाळ) गावापासून अर्ध्या किलोमीटर अंतरावर असलेल्या वळणावर समोरून आलेला आयशर टेम्पो (एपी 04, बीटी 2036) दिसला नाही. त्यामुळे भरधाव वेगात असलेल्या दोन्ही वाहनांमध्ये जोरदार धडक झाली. ही धडक इतकी जोरदार होती की, कारच्या समोरच्या बाजूचा चक्‍काचूर झाला. कारमधील चौघांपैकी तिघे जण जागीच ठार झाले. अपघातातील टेम्पो हा केळी भरून कर्नाटककडे निघाला होता.

अपघातानंतर कोकळे येथील तरुणांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातातील गाड्या रस्त्याच्या बाजूला घेण्यात आल्या. जखमी मोहिते यांना कवठेमहांकाळच्या उपजिल्हा रुग्णालयात तातडीने पाठविण्यात आले. अपघातस्थळी कारच्या काचा, रक्‍ताचा सडा पडला होता. गाडीमध्ये रक्‍ताचे थारोळे साचल्याचे दिसत होते.अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक अजित भोसले करीत आहेत.

जयसिंगपुरात हळहळ

जयसिंगपूर प्रतिनिधी कळवतो की, जत-कवठेमहांकाळ मार्गावर कोकळे येथे झालेल्या भीषण अपघातात जयसिंगपूरमधील दोघे आणि शिरोळ (मूळ रा. जत) येथील एक असे तिघे जण ठार  झाले. मृतांत शिवसेना ग्राहक संरक्षण मंचचा शहराध्यक्ष विशाल माळी (वय 28) याचा समावेश आहे.  राजीव गांधीनगरातील नवव्या गल्लीतील विजय साळुंखे या मित्राच्या विवाहासाठी सर्व जण सकाळी साडेदहाच्या सुमारास गेले होते. विशाल माळी हा गाडी चालवीत होता. लग्‍नकार्यासाठी शेव्हरेले बीट कारमधून ते गेले होते. परतत असताना काळाने त्यांच्यावर झडप घातली.  मोहिते हा मूळचा जत येथील असून, अलीकडेच तो शिरोळ येथे वीटभट्टीवर कामाला आला होता.

अपघाताची माहिती मिळताच राजीव गांधीनगरात नवव्या गल्लीत गर्दी झाली होती. विशाल माळी याच्या पश्‍चात पत्नी, दोन मुले, आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. गेल्या दीड- दोन वर्षांपासून शिवसेना ग्राहक मंचचे काम पहात होता. सुभाष चव्हाण याला एक मुलगा, पत्नी, आई-वडील व दोन भाऊ असा परिवार आहे. तो इंटिरीयल डिझायनिंगचे काम करीत होता. त्याने गुढीपाडव्यादिवशी लक्ष्मी चायनीज अँड फास्टफूड सेंटर सुरू केल होते. लखन मोहितेच्या पश्‍चात पत्नी, एक मुलगी, वडील, भाऊ असा परिवार आहे. रात्री उशिरा चव्हाण व माळी यांच्या मृतदेहावर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. मोहितेवर जतजवळ त्याच्या गावी अंत्यसंस्कार करण्यात आले.

हद्दीबाबत संभ्रम

अपघाताच्या नेमक्या ठिकाणाबाबत संभ्रम निर्माण झाला. सुरुवातीला हा अपघात जत पोलिस ठाण्याच्या हद्दीत झाल्याचे सांगण्यात आले. कोकळे गावच्या ओढ्यावरील पूल संपल्यानंतर लगेचच जत तालुक्याची हद्द सुरू होते. त्यामुळे नेमका अपघात कवठेमहांकाळ तालुक्याच्या हद्दीत घडला की जतच्या, याविषयी दोन्ही तालुक्यांच्या पोलिसांकडून माहिती मिळत नव्हती. कवठेमहांकाळ आणि जत पोलिस घटनास्थळी  आले होते. अखेर कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचा निर्णय घेण्यात आला.