Wed, Mar 27, 2019 03:56होमपेज › Sangli › जयंतराव, घोरपडे यांची बंद खोलीत चर्चा

जयंतराव, घोरपडे यांची बंद खोलीत चर्चा

Published On: May 07 2018 2:04AM | Last Updated: May 06 2018 11:46PMकवठेमहांकाळ : प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील आणि माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांनी एकाच वाहनातून प्रवास केला. पाटील यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल घोरपडे यांनी सत्कार आणि अभिनंदन केले. त्यानंतर दूध संघाच्या कार्यालयात दोन्ही नेत्यांची बंद खोलीत बैठकही झाली. त्यांच्या या बैठकीमुळे तालुक्यातील राजकीय समिकरण बदलण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांनी मागील विधानसभा निवडणुकीवेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी भाजपकडून विधानसभाही लढविली. त्यामध्ये त्यांचा पराभव झाला. त्यानंतर ते कधी भाजपमध्ये; तर कधी स्वतंत्र अस्तित्व दाखवत असल्याचे चित्र दिसत होते. पंचायत समिती आणि जिल्हा परिषद, कवठेमहांकाळ नगरपंचायतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीबरोबर घोरपडे यांनी आघाडी केली.

त्यातच खासदार संजय पाटील आणि घोरपडे यांच्यामध्ये मोठी दरी निर्माण झाली. त्यामुळे घोरपडे यांनी कायम स्वतंत्र अस्तित्व ठेवले. शेतकरी विकास आघाडीच्या माध्यमातून ते अनेकवेळा सक्रीय असल्याचे दिसले; मात्र त्यांनी भाजपशी काडीमोडही त्यांनी घेतल्याचे दिसले नाही. जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीत त्यांनी भाजपचे उमेदवार संग्रामसिंह देशमुख यांना पाठिंबा दिला. त्याचबरोबर मंत्री सुभाष देशमुख यांच्याशी त्यांचे राजकीय संबंधही दिसून आले.

माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांची ओळख राजारामबापू पाटील यांचे कार्यकर्ते अशी होती. राजारामबापूंच्या पश्‍चात आमदार जयंत पाटील यांच्याशी त्यांचे राजकीय संबंध असल्याचे अनेकवेळा स्पष्ट झाले. आता जयंत पाटील यांची राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर घोरपडे यांनी त्यांचा सत्कार केला. आज आमदार पाटील हे स्व. विजयराव सगरे यांची कन्या श्‍वेता हिच्या विवाहासाठी कवठेमहांकाळमध्ये आले. त्यावेळी पाटील आणि घोरपडे यांनी एकाच वाहनातून महांकाली कारखाना ते दूध संघाच्या कार्यालयापर्यंत प्रवास केला. त्यानंतर दूध संघाच्या कार्यालयात आमदार पाटील यांचा राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल घोरपडे यांनी सत्कार केला. या भेटीवेळी तात्यासाहेब नलवडे आणि पांडुरंग पाटील हे उपस्थित होते.