Tue, Jul 16, 2019 09:56होमपेज › Sangli › जयंत पाटील यांचे दबावाचे राजकारण

जयंत पाटील यांचे दबावाचे राजकारण

Published On: Feb 17 2018 2:08AM | Last Updated: Feb 16 2018 11:31PMइस्लामपूर : शहर वार्ताहर

तालुक्यात आमदार जयंत पाटील यांचे दबावाचेे राजकारण सुरू आहे . ते यापुढे चालू देणार नाही.  राजकारणात नेहमी दुसर्‍याला पुढे करण्यापेक्षा समोरासमोर या. तुमच्याबरोबर लढण्याची तयारी कार्यकर्त्यांनी केली आहे. आम्हीही भोसले-पाटील आहोत, असे आव्हान नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी  पत्रकार बैठकीत दिले. 

तेरा महिन्यांत शासनाकडून आलेल्या निधीचा हिशोब, विकासकामे बघण्यासाठी आमदार जयंत पाटील यांनी वेळ व तारीख द्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. दोन दिवसांपूर्वी उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील, नगरसेवक शहाजी पाटील यांनी शहरासाठी आलेल्या आणि न आलेल्या विकासनिधींवर आक्षेप घेत टीका केली होती. याबाबत नगराध्यक्ष पाटील यांनी  प्रत्युत्तर दिले.

नगराध्यक्ष पाटील म्हणाले, पालिकेत सत्तेवर  आल्यापासून आजअखेर  4 कोटी 35  लाख रुपयांची विकासकामे पूर्ण झाली आहेत. 15 कोटी  13 लाख  74 हजारांची विकासकामे सुरू आहेत. आजअखेर  46 कोटी 32 लाखांचा निधी मिळाला असून  81 कोटी  36 लाखांचा निधी अजून मिळणार आहे. 40 कोटी 98  लाख  79 हजारांच्या पालिकेच्या ठेवी आहेत.  11 कोटी 73  लाखांचा निधी बँकेत शिल्लक आहे.

उपनगराध्यक्ष  पाटील यांनी निधीचा हिशोब मागितला आहे. याचे  आश्चर्य वाटते. पालिकेतील प्रत्येक गोष्टीची माहिती त्यांना असणे आवश्यक आहे. हिशेब मागणे आणि हिशेब करणे हे त्यांना चांगले माहित आहे, असा टोला नगराध्यक्ष पाटील यांनी लगावला. 

कृषी महोत्सवातील मंत्री खोत यांनी केलेली टीका आ. पाटील यांना झोंबली आहे. राजारामबापू ज्ञानप्रबोधिनीला सेतूचे टेंडर मिळाल्यानंतर नगरसेवक शहाजी पाटील यांची खासगीत काय प्रतिक्रिया होत्या, हे सर्वांना माहित आहे. रयत क्रांतीचे नेते सागर खोत ,नगरसेवक सतिश महाडीक, भाजपचे तालुकाध्यक्ष प्रसाद पाटील, आरपीआयचे अरुण कांबळे आदी उपस्थित होते.   

लवकरच कोरे यांची भेट...

राष्ट्रवादीचे गटनेते संजय कोरे यांनी राजीनामा दिला आहे. कोरे हे अभ्यासू नगरसेवक आहेत. पालिकेतील कामकाजाबाबत मी त्यांचे मार्गदर्शन घेत होतो. यापुढेही त्यांचे मार्गदर्शन घेईन. लवकरच मी कोरे यांची भेट घेणार असून त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचे नगराध्यक्षांनी सांगितले.