Fri, Feb 22, 2019 15:39



होमपेज › Sangli › राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षपदी जयंत पाटील

राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षपदी जयंत पाटील

Published On: Apr 30 2018 1:46AM | Last Updated: Apr 30 2018 12:19AM



पुणे : प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी माजी मंत्री जयंत पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख पदाधिकार्‍यांची राज्यस्तरीय बैठक रविवारी पुण्यात झाली. तत्पूर्वी, पक्षाच्या प्रमुख नेत्यांची शरद पवार यांच्या मोदी बागेतील निवासस्थानी बैठक झाली. या बैठकीत प्रदेशाध्यक्ष पदासाठी जयंत पाटील यांच्या नावावर शिक्‍कामोर्तब करण्यात आले.

मावळते प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी प्रदेशाध्यक्ष पदासाठी जयंत पाटील यांच्या नावाची सूचना केली. शशिकांत शिंदे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी त्यास अनुमोदन दिले. याच बैठकीत  खजिनदारपदासाठी हेमंत टकले, तर प्रदेश उपाध्यक्षपदासाठी नवाब मलिक यांच्या नावांची घोषणा करण्यात आली. उर्वरित प्रदेश पदाधिकारी आणि जिल्हाध्यक्ष निवडीचे अधिकार प्रदेशाध्यक्ष व केंद्रीय पदाधिकार्‍यांना देण्याचा ठराव यावेळी एकमताने मंजूर करण्यात आला. नवनियुक्‍त पदाधिकार्‍यांचा आणि मावळते प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा सत्कार राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आला. तर शरद पवार यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाल्याबद्दल पक्षाचे ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड आणि अरुण गुजराथी यांनी त्यांचा सत्कार केला. नवनियुक्‍त प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रदेश सरचिटणीसपदी शिवाजीराव गर्जे यांची नेमणूक केल्याची घोषणा केली.

चार महिन्यांत राज्यभर बूथ कमिट्या स्थापणार : पाटील

निवडणूक जिंकण्यासाठी बूथ कमिट्यांच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. येत्या चार महिन्यांत राज्यातील 91 हजार 500 बूथ कमिट्या स्थापन केल्या जातील. या बूथ कमिट्यांचा आणि पदाधिकार्‍यांच्या कामांचा परफॉर्मन्स मोजला जाईल. सरकारविरोधात तीव्र असंतोष आहे. ‘हल्लाबोल’ आंदोलनाच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसने सरकारविरोधात आवाज उठवल्याने जनतेला या पक्षाचा आधार वाटत आहे, असे मत प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर जयंत पाटील यांनी व्यक्‍त केले.

जयंत पाटील यांचा राजकीय प्रवास

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते स्व. राजारामबापू पाटील यांचे सुपुत्र असलेले जयंत पाटील यांनी राजारामबापू पाटील यांच्या निधनानंतर 1984 साली राजकारणात प्रवेश केला. ते 1990 साली प्रथम काँग्रेसच्या तिकिटावर इस्लामपूरमधून विधानसभेवर निवडून गेले. त्यानंतर 1999 साली राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर विधानसभेत निवडून गेल्यानंतर आघाडी सरकारच्या काळामध्ये 1999 ते 2008 अर्थमंत्रिपदावर उल्लेखनीय काम केले. 26/11 च्या हल्ल्यानंतर स्वर्गीय आर. आर. पाटील यांनी गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यावर जयंत पाटील यांची गृहमंत्रिपदी निवड करण्यात आली. पाटील यांनी पोलिस दलात हायटेक टेक्नॉलॉजीने सुसज्ज बंदुका आणल्या, फोर्स वनची स्थापना केली. त्यानंतर 2009 ते 2012 राज्याच्या ग्रामविकास मंत्रिपदाचा कारभार सांभाळला. त्यानंतर 2014 पासून ते विधानसभेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेतेपद सांभाळत आहेत. ते राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्षही आहेत.

Tags : sangli, sangli news, Jayant Patil, NCP, state president,