Fri, Aug 23, 2019 23:12होमपेज › Sangli › जयंत पाटील राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षपदी 

जयंत पाटील राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षपदी 

Published On: Apr 23 2018 1:18AM | Last Updated: Apr 23 2018 12:38AMमुंबई : चंदन शिरवाळे

राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी शरद पवार यांची निवड झाल्यानंतर पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी विधानसभेतील राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील यांची निवड केली जाणार आहे. पुण्यात 29 एप्रिल रोजी होणार्‍या तालुकाध्यक्ष आणि प्रदेश प्रतिनिधींच्या बैठकीत याबाबत अधिकृत घोषणा केली जाणार आहे.

राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी विद्यमान अध्यक्ष आ. सुनील तटकरे यांच्यासह ज्येष्ठ नेते दिलीप वळसे-पाटील, आ. शशिकांत शिंदे उत्सुक होते. मात्र, खा. सुप्रिया सुळे यांनी जयंत पाटील यांच्या पारड्यात वजन टाकल्याने इच्छुकांचे पत्ते गळाल्याचे बोलले जात आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र घेण्याबाबत दिल्लीत हालचाली सुरू असल्याच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादीने खांदेपालट करण्याचा निर्णय घेतला आहे.

मागील विधानसभा निवडणूक प्रचारात राष्ट्रवादीचे पहिल्या फळीतील नेते अजित पवार, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांच्यावर भाजपने भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. यामुळे राष्ट्रवादीचे मोठे नुकसान झाले; अन्यथा काँग्रेसपेक्षा काही जादा जागा पक्षाला मिळाल्या असत्या. सध्या भुजबळ तुरुंगात आहेत, तर तटकरे आणि अजित पवार यांच्यावर चौकशीची टांगती तलवार आहे. या नेत्यांच्या आडून सत्ताधार्‍यांना राष्ट्रवादीला पुन्हा आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करता येऊ नये, यासाठी जयंत पाटील यांच्यासारख्या मोहर्‍याच्या गळ्यात प्रदेशाध्यक्षपदाची माळ घालण्याची रणनीती राष्ट्रवादीने आखली आहे.

आ. जयंत पाटील यांनी गटनेते म्हणून विधानसभेत प्रभावी कामगिरी आहे. मुद्देसूद मांडणी आणि खास शैलीतून ते सत्ताधार्‍यांची बोलती बंद करतात. तसेच सांगली या आपल्या होमपीचवरही त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवून पक्षाचे मजबूत स्थान निर्माण केले आहे. या बळावर त्यांची निवड होणार असल्याचे राष्ट्रवादीच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले.

Tags : sangli, Jayant Patil, Nationalist, State President, sangli news,