Sat, Jul 20, 2019 08:36होमपेज › Sangli › जयंत पाटील धनगराच्या वेशात विधानभवनात

जयंत पाटील धनगराच्या वेशात विधानभवनात

Published On: Dec 21 2017 1:51AM | Last Updated: Dec 20 2017 11:31PM

बुकमार्क करा

नागपूर : प्रतिनिधी

धनगर आरक्षणाचा प्रश्‍न मांडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री जयंत पाटील यांनी वेगळी शक्‍कल लढविली. ते आज विधानभवनात धनगराच्या वेशात आले. दिवसभर ते याच वेशात होते. धनगरांच्या प्रश्‍नाकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आपण धनगराच्या वेशात आल्याचे त्यांनी सांगितले.

पांढरे शुभ्र धोतर, पांढरा कुडता, पिवळ्या रंगाचा फेटा, खांद्यावर घोंगडे व हातात काठी अशा वेशात जयंत पाटील यांचे दर्शन आज विधान भवन परिसरात झाले. वेगळा वेश करून येणारे अनेक आमदार काही वेळासाठी राहतात व विधानभवनात जाताना नेहमीच्या वेशात जातात. परंतु, जयंत पाटील आज दिवसभर धनगराच्या वेशात राहिले व विधानसभा सभागृहातसुद्धा याच वेशात राहिले.

जयंत पाटील म्हणाले, विरोधी पक्षात असताना भाजप व देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेत आल्यानंतर 15 दिवसांत धनगरांना आरक्षण देण्यात येईल, असे आश्‍वासन दिले होते. आता तीन वर्षांपेक्षा अधिक काळ लोटल्यानंतरही धनगरांचा प्रश्‍न सुटलेला नाही. मुख्यमंत्र्यांच्या सभेत ‘क्या हुआ तेरा वादा’ हे गाणे लावून आठवण करून द्यावी लागली. सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याच्यासंदर्भातसुद्धा अद्यापही कोणतीही कार्यवाही सरकारने केलेली नाही, असेही पाटील यांनी निदर्शनास आणून दिले. यासंदर्भात धनगरांच्या संघटनांनी वेळोवेळी आंदोलने करूनही राज्य सरकार दखल घेत नाही. केवळ आशसने देऊन धनगरांची दिशाभूल करण्याचे काम भाजप करीत असल्याचा आरोप त्यांनी केला.