Sat, Sep 22, 2018 01:39



होमपेज › Sangli › भाजपकडून लोकांना खरेदी करण्याची भाषा : जयंत पाटील 

भाजपकडून लोकांना खरेदी करण्याची भाषा : जयंत पाटील 

Published On: Jun 25 2018 1:52AM | Last Updated: Jun 25 2018 12:19AM



सांगली : प्रतिनिधी

सांगली महानगरपालिका निवडणुकीत लोकांना खरेदी करण्याची भाषा भाजपचे मंत्री करीत आहेत. येथील सामान्य माणूस स्वाभिमान गुंडाळून भाजपबरोबर जाणार नाही. येत्या निवडणुकीत भाजपला योग्य जागा दाखवेल, अशी टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. 

उत्कर्ष हडको कॉलनी संजयनगर येथे राष्ट्रवादीची जनसंवाद बैठक झाली. जिल्हाध्यक्ष (शहर) संजय बजाज, खादी ग्रामोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष सुरेश पाटील, राष्ट्रवादीचे सांगली विधानसभा क्षेत्र अध्यक्ष कमलाकर पाटील, श्रीनिवास पाटील, प्रा. पद्माकर जगदाळे, शेडजी मोहिते, विष्णू माने, विनया पाठक, सर्जे, धनंजय पाटील, खांडेकर उपस्थित होते. 

जयंत पाटील म्हणाले, केंद्र, राज्यात चार वर्षे सत्तेत असलेल्या भाजपने सांगली महापालिका क्षेत्राच्या विकासाचे एकही काम केले नाही. मात्र लोकांना खरेदी करून निवडणुका जिंकण्याची भाषा करू लागले आहेत.   निवडणूक जाहीर झाल्यानंतर भाजपचे डझनभर मंत्री गल्लोगल्ली फिरतील. त्यांच्या फिरण्याने आणि पोकळ आश्‍वासनांनी विकास होत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचंड आश्‍वासने दिली. पण महागाई कमी झाली नाही. बेरोजगारी कमी झाली नाही. 

विकासाचे कोणतेही ठोस काम झाले नाही. केवळ भाषणबाजीतून विकास होत नाही. काम करणार्‍या पक्षाच्या मागे राहिले पाहिजे, हे आता जनतेने ओळखले आहे. महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीला निश्‍चितपणे मोठे यश मिळेल. युवकांना रोजगार, महिलांच्या हाताला काम देण्याबरोबरच शहराच्या सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रवादी कटीबद्ध राहील. 

कमलाकर पाटील म्हणाले, भाजपने साम, दाम, दंड, भेद नितीचा अवलंब करण्यास सुरूवात केली आहे.  विरोधकांच्या घरात घुसून हल्ला केला जात आहे. दहशत माजविण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. लोक त्यांना योग्य धडा शिकवतील. 

दहशत माजवून विजय मिळत नसतो, अशी टीका नगरसेवक विष्णू माने यांनी भाजपवर केली. यावेळी अनिता पांगम, आयेशा शेख, सुनीता कोळी व कार्यकर्ते उपस्थित होते.