Wed, Jul 24, 2019 12:49होमपेज › Sangli › अधिक मासामुळे जावईबापूंना अच्छे दिन!

अधिक मासामुळे जावईबापूंना अच्छे दिन!

Published On: May 15 2018 1:34AM | Last Updated: May 15 2018 1:34AMसमडोळी : वार्ताहर

दर तीन वर्षांनी अधिक मास 16 मे पासून सुरू होत आहे. या महिन्यात मुलींना व जावईबापूंना अधिक मासानिमित्त घरी बोलावून वाण देण्याची प्रथा, रुढी परंपरेनुसार पाळली जाते. त्यामुळे अधिक मासात जावईबापूंना वाण व नवीन कपडे मिळतात. यामुळे सध्या जावईबापूंना सासरवाडीचे वेध लागले आहेत. अधिक मासाला पुरुषोत्तम मास असेही म्हटले आहे.  या महिन्यात भगवान श्रीकृष्णाची भक्ती केल्याने इच्छित फलप्राप्ती होत असल्याची आख्यायिका आहे. या जुन्या परंपरेनुसार या महिन्यात जावयांना घरी बोलावून मान-सन्मान केला जातो. त्यांना नवीन कपडे, वाण देण्याची प्रथा आपल्या संस्कृतीत कायम आहे. त्यामुळे यावर्षी नव्याने बंधनात अडकलेल्या व जुन्या जावईबापूंंना अच्छे दिन येणार आहेत. 

अमावस्या संपल्यानंतर अधिक मासाला सुरुवात होणार असून, तीन वर्षानंतर जावईबापूंंना सासरवाडीकडे जाण्याचा योग असल्याने जावईबापूंचे सर्व लक्ष सासरवाडीकडे लागले आहेत. धोंडाचा महिना येत असल्याने सासू-सासर्‍यांनीसुध्दा आपल्या लेकीला व जावईबापूंना आपल्या घरी बोलावून वाण देवून पुण्य पदरात पाडण्यासाठी चांगलीच कंबर कसली आहे. सध्या उन्हाळ्याने अधिकच जोर धरला आहे. शेतातील मशागतीची कामे पूर्ण करण्यासाठी वेग आला आहे. तरीदेखील जावई नाराज होऊ नये म्हणून सासरे काळजी घेताना दिसून येतात. नैसर्गिक संकट, वादळी वारा, अवकाळी पाऊस याने शेतकर्‍यांच्या तोंडचा घास हिरावून घेतला आहे. या संकटाचा सामना करणार्‍या कुटुंबियांनाही या धोंड्याच्या महिन्यात लेकीला व जावयांना घरी बोलावावे लागणार आहे. त्यामुळे पाहुणचाराचा आनंद जावईबापूंना लाभणार आहे.

हायफाय जावयांचा अजब थाट

रुढी परंपरा जपत असताना सासरकडच्या मंडळींची सध्या गोची होताना दिसते आहे. कारण काळानुरूप जावयांना कपड्याऐवजी सोन्याची अंगठी, चेन, ब्रेसलेट आदींच्या काही जावई हट्टाने सासूरवाडीकडील मंडळी भलतीच जाम झाल्याची चित्रे आहेत. त्यामुळे हाय प्रोफाईल असणार्‍या जावयांच्या अजब हट्टापुढे सासरकडची मंडळी सध्या बेजार आहेत.