Sun, Jul 21, 2019 16:32
    ब्रेकिंग    होमपेज › Sangli › जत तालुका गांजा उत्पादनाचे आगर!

जत तालुका गांजा उत्पादनाचे आगर!

Published On: May 17 2018 1:24AM | Last Updated: May 16 2018 11:23PMसांगली : अभिजित बसुगडे

ऊस आणि द्राक्षांसाठी सांगली जिल्ह्याचा सर्वत्र नावलौकिक आहे. मात्र सध्या या लौकिकाला बाधा निर्माण करीत जिल्ह्याची नवी ओळख देशात बनू पाहत आहे. जत तालुक्यात घेतल्या जाणार्‍या गांजाच्या भरघोस पिकामुळे जिल्ह्याचा लौकिक खराब होत आहे. जत तालुक्यात फारशी शेती पिकत नसली तरी गांजाचे मळे व चंदनाची झाडे मात्र जोमात फुलत आहेत. त्यामुळे जतला उपहासाने गांजा, चंदनाचे नंदनवन असेही संबोधले जाते. म्हणूनच जत तालुका म्हणजे गांजा उत्पादनाचे आगर बनले आहे. 

शेतातच पिकणारा गांजा, ओढ्याकाठी मुबलक प्रमाणात असलेले चंदन यामुळे जत हे आंतरराज्य तस्करांचे केंद्रही आहे. एका गॉडफादरच्या वरदहस्ताने सीमावर्ती भागात चंदन, गांजाचे रॅकेट चालविले जाते. त्यामधून आठवड्याला काही कोटींची उलाढाल होत असल्याची चर्चा आहे. नुकतेच उमदी पोलिसांनी कर्नाटकातील एका चंदन तस्करास अटक केल्यानंतर चंदन तस्करी पुन्हा चर्चेत आली आहे.

चंदन, गांजा व जत तालुक्याचे समीकरण फार जुने आहे. पूर्वभागाचे शेजारच्या कर्नाटक राज्याशी कनेक्शन असल्याने तस्करीचे एक मोठे रॅकेट कार्यरत आहे. कर्नाटकातील गुन्हेगारी टोळ्या, तस्कर यांच्या माध्यमातून हे रॅकेट चालविले जात आहे. कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा व केरळमध्ये चंदन व गांजाची तस्करी केली जात आहे. महाराष्ट्रातील पुणे, मुंबई तसेच शेजारच्या गोवा राज्यातही तस्करांचे नेटवर्क कार्यरत आहे.  कोणत्याही पिकात आंतरपीक म्हणून गांजाची शेती केली जाते. विशेषतः झेंडू, ऊस अशा पिकांत गांजाची झाडे लावली जातात. याच झाडांपासून गांजा तयार केला जातो. काही वर्षांपूर्वी किरकोळ स्वरूपात होणारे गांजाचे उत्पादन आता कित्येक पटीने वाढल्याचे चित्र आहे. सीमाभागात याचे उत्पादन आणि तस्करी मोठ्या प्रमाणात केली जाते.  

गुंडांच्या टोळ्या आणि गॉडफादरचा वरदहस्त असलेले गावगुंड तस्करीत गुंतले आहेत. सीमेलगत  कर्नाटकातील काही गावांमधून चंदन व गांजाच्या खरेदीचा व्यापार चालविला जातो. कोंत्यावबोबलाद, मोटेवाडी (कोंत्यावबोबलाद), करेवाडी, गिरगाव, भिवर्गी, मुचंडी, उमदी व पश्‍चिम भागातील हिवरे, बाज, बेळुंखी ही काही गावे सध्या तस्करीमुळे चर्चेत आहेत. एका गॉडफादरच्या आशीर्वादाने अनेक वर्षांपासून गांजा व चंदन तस्करीचे रॅकेट चालविले जाते. त्यांचे आंंतरराज्य टोळ्यांशीही हितसंबंध असल्याची चर्चा आहे. जत, शिराळा, वाळवा तालुक्यासह तासगाव तालुक्यातील काही भागातही गांजाचे उत्पादन घेतले जात असल्याची चर्चा आहे.

पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी कार्यभार घेतल्यानंतर गांजा बाळगणार्‍यांसह ओढणार्‍यांवर कडक कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार काही ठिकाणी कारवाईही करण्यात आली. मात्र त्यामध्ये सातत्य नाही.   केवळ गांजावरील कारवाईसाठी एक विशेष पथक नेमण्याची गरज आहे.  गांजा उत्पादनासाठी जतची भूमी सुपीक मानली जाते. दुष्काळामुळे शेती व शेतकरी देशोधडीला लागल्याने सीमावर्ती भागातील काहींनी शेतीच्या आडून गांजाचे मळे फुलविण्याचा उद्योग सुरू केला आहे. 

कोणत्याही रोगास बळी न पडणारे कमी पाण्यात येणारे गांजा हे झुडूपवर्गीय पीक आहे. दिसायला ते अगदी हूबेहूब झेंडूच्या रोपट्यासारखे दिसते. सात ते आठ फुटांपर्यंत त्याची वाढ होते. मात्र सहा फुटांच्या आतच त्याचे  उच्चाटन केले जाते.  लागवड, औषध फवारणीचा खर्च नगण्य आहे. त्यामुळेच जत तालुक्यात  मोठ्या प्रमाणात लागवड केली जात असल्याची चर्चा आहे.

एकरी मिळते दोन कोटींचे उत्पन्न...

साधारणतः एक एकरामध्ये गांजाची लागवड केल्यानंतर पाच ते सहा महिन्यात त्याचे पीक हातात येते. साधारणपणे एकरी एक टन गांजाचे उत्पादन सहज मिळते. बाजाराभावानुसार त्याची किंमत सुमारे दोन कोटी रुपये होते. मात्र गांजाच्या झाडांचा वास दूरवर पसरत असल्याने केवळ काही क्षेत्रातच याची लागवड केली जाते. तरीही येथील उत्पादक आणि तस्कर यातून कोट्यवधींची माया जमवतात. गांजातून मिळणारे उत्पन्न ऊस, द्राक्षापेक्षाही अधिक असल्याचेच यातून स्पष्ट होते. 

झेंडू, उसात लागण, बियाणे कर्नाटकातून

गांजा उत्पादन करणारे मोठी खबरदारी घेऊन त्याची लागण करीत असतात. गांजाच्या झाडांचा वास दूरपर्यंत पसरतो. त्यामुळे मोठ्या क्षेत्रातील उसात याची लागवड केली जाते. शिवाय झेंडूच्या झाडासारखीच गांजाची झाडे असल्याने झेंडूमध्येही हे पीक घेतले जाते. यासाठी उत्पादकांकडून कर्नाटकातून बियाणे खरेदी केले जात आहे. सीमाभागातील शहरांमध्ये याचे बियाणे सहज उपलब्ध होत असल्याने उत्पादक तेथूनच याचे बियाणे खरेदी करण्यास पसंती देत आहेत. 

बंगळुरू, हैद्राबाद, मुंबई, पुण्यात विक्री...

जत तालुक्यात उत्पादन केलेल्या गांजाची सीमावर्ती भागात गोदामे असल्याची चर्चा आहे. या भागात दोन्ही राज्यातील पोलिसांची गस्त कमी असते. शिवाय अनेकजण तस्करांच्या साखळीतच गुंतले असल्याने या गोदामांवर कारवाई होत नाही. या गोदामातून बंगळुरू, हैद्राबाद, मुंबई, पुण्याकडे गांजा पाठविला जातो. कर्नाटकमार्गे त्याची तस्करी केली जाते. गोव्यालाही मोठ्या प्रमाणात या परिसरातून गांजा पुरवला जात असल्याचे सांगितले जाते. 

गांजा उत्पादक, तस्करांचा गॉडफादर कोण?

गांजा उत्पादक आणि तस्करांचा एक गॉडफादर असल्याची जिल्ह्यात जोरदार चर्चा आहे. राजकीय वर्तुळातही त्याचे चांगलेच वजन असून या गॉडफादरच्या आशीर्वादानेच गांजाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन आणि तस्करी केली जात असल्याची चर्चा आहे. आजपर्यंत झालेल्या पोलिस कारवाईत या गॉडफादरच्या जवळपासही कोणी जाऊ शकले नाही. त्यामुळे तो राजकीय वजन वापरून या व्यवसायातील बगलबच्च्यांना वाचवत असल्याचीही चर्चा आहे.