Wed, Jul 17, 2019 18:03होमपेज › Sangli › जतच्या विकासासाठी 60 कोटींचे प्रस्ताव

जतच्या विकासासाठी 60 कोटींचे प्रस्ताव

Published On: Jan 21 2018 2:53AM | Last Updated: Jan 21 2018 12:34AMजत : प्रतिनिधी

जत पालिका नुतन नगर मंडळाच्या पहिल्याच सभेत शहरांच्या विकासाचा दमदार आराखडा मांडण्यात आला. त्यात सुधारित पाणी योजनेसह 60 कोटी रूपयांच्या कामाचे प्रस्ताव पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. सध्याच्या फिल्टर हाऊस व पाणी टाकीच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेण्यात आला. नगराध्यक्षा शुभांगी बन्नेनवर यांच्या अध्यक्षतेखाली नगरमंडळाची पहिली सभा घेण्यात आली. सभेस उपनगराध्यक्ष आप्पा पवार, मुख्याधिकारी हेमंत निकम, राष्ट्रवादी गटनेते स्वप्नील शिंदे, काँग्रेस गटनेते इकबाल गवंडी, नगरसेवक टीमू एडके, भारती प्रवीण जाधव, वनिता अरूण साळे, बाळाबाई पांडुरंग मळगे, प्रकाश माने, निलेश बामणे, दिप्ती सावंत, गायत्रीदेवी शिंदे आदी उपस्थित होते.

राष्ट्रवादी गटनेते स्वप्नील शिंदे यांनी, फिल्टर हाऊस व पाण्याची टाकी याठिकाणी रंगीत पार्ट्या व पत्त्याचे डाव सुरू असतात. शहराच्यादृष्टीने अत्यंत महत्वाचे हे ठिकाण आहे. त्यामुळे फिल्टर हाऊस व पाण्याच्या टाकीची सुरक्षा धोक्यात आली आहे. ही बाब गंभीर असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले. मुख्याधिकारी निकम यांनी पाण्याच्या टाकीच्या परिसरात सीसीटिव्ही बसविण्यात येईल, असे जाहीर केले. तसेच याठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडल्यास कारवाई करण्याचा इशारा दिला. शहरासाठी सुधारित पाणी योजनेच्या प्रस्तावास मंजुरी देण्यात आली. शहरातील जुनी पाईप लाईन बदलणे, प्रत्येक प्रभागासाठी स्वतंत्र पाण्याची टाकी उभारणे, फिल्टर हाऊसची क्षमता वाढविणे याचा त्यात समावेश आहे.

सुमारे सात कोटी रूपयांची ही प्रस्तावित योजना आहे. दलित वस्ती योजनेतील 1 कोटी 80 लाख रूपयांच्या कामांचे प्रस्ताव पाठविण्यासाठी ही तातडीची बैठक बोलावण्यात आली होती. या निधीतून शहरातील अनेक विकास कामांचे ठराव यावेळी मंजूर करण्यात आले.  राष्ट्रवादी व काँग्रेस नेत्यांमध्ये पालिकेत जुगलबंदी रंगली. गवंडी यांनी सभेचे कामकाज संपविण्यासाठी राष्ट्रगीत घ्या, अशी सुचना मांडली. त्यावर शिंदे यांनी सर्व विषय झाल्याशिवाय सभा संपविता येणार नाही. ज्यांना घाई झाली असेल त्यांनी बाहेर जावे, असे सुनावले. नगराध्यक्षा बन्नेनवर, भाजपच्या दिप्ती सावंत व काँग्रेस गटनेते गवंडी यांच्यातही शाब्दिक चकमक झाली. नगराध्यक्षांना विचारलेल्या प्रश्‍नांना गवंडी  उत्तर देऊ लागल्याने भाजप सदस्यांनी आक्षेप घेतला.