Thu, Jan 30, 2020 00:41होमपेज › Sangli ›  जत नगराध्यक्षपदी काँग्रेसच्या शुभांगी बन्‍नेनवर

 जत नगराध्यक्षपदी काँग्रेसच्या शुभांगी बन्‍नेनवर

Published On: Dec 12 2017 2:09AM | Last Updated: Dec 12 2017 12:11AM

बुकमार्क करा

जत : प्रतिनिधी 

जत नगरपालिकेत मतदारांनी सलग दुसर्‍यांदा कोणत्याही पक्षाला बहुमत दिले नाही. मात्र, काँग्रेसच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार शुभांगी अशोक बन्‍नेनवर विजयी झाल्या. पालिकेत भाजपला सर्वाधिक 7, राष्ट्रवादी व काँग्रेसला प्रत्येकी 6  आणि बसपला एक जागा मिळाली आहे. अनेक दिग्गज उमेदवारांचा पराभव झाला. त्यामुळे सर्वच पक्षांची अवस्था ‘थोडी खुशी, थोडा गम’ अशी झाली आहे. 

चुरशीच्या लढतीत नगराध्यक्षपदी काँग्रेसच्या  शुभांगी बन्‍नेनवर  अवघ्या 178 मते अधिक घेऊन विजय झाल्या. शेवटच्या टप्प्यात आघाडी घेत, त्यांनी भाजपवर मात केली. बन्‍नेनवर यांना 7 हजार219 मते मिळाली. भाजपच्या डॉ. रेणुका रवींद्र आरळी यांना 7 हजार 41 मते मिळाली. राष्ट्रवादीच्या शबाना इनामदार यांना 3 हजार 861 मते तर सेनेच्या शांता राठोड यांना अवघी 246 मते मिळाली.

बहुमताचा दावा कोण करणार?

पालिका सभागृहात मात्र कोणत्याच पक्षाला  बहुमत मिळाले नाही. आमदार विलासराव जगताप यांच्या नेतृत्वाखालील भाजपला सर्वाधिक 7 जागा मिळाल्या. सुरेश शिंदे यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी व विक्रम सावंत यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसला प्रत्येकी 6 जागा मिळाल्या. काँग्रेसचा सहयोगी पक्ष बसपला 1 जागा मिळाली आहे. एकाही अपक्षाला मतदारांनी स्वीकारले नाही. त्यामुळे उपनगराध्यक्षपद कोणाला मिळणार व सभागृहात बहुमताचा दावा कोण करणार, याबद्दल उत्सुकता आहे. 

पक्षनिहाय विजयी उमेदवार राष्ट्रवादीचे नेते सुरेश शिंदे यांचे चिरंजीव स्वप्निल विजयी झाले. सभागृहातील ते सर्वात तरूण नगरसेवक आहेत. राष्ट्रवादीचे आप्पासाहेब पवार यांनी प्रभाग-1मधून नगरसेवक परशुराम मोरे यांचा पराभव केला. प्रभाग-9मधील लक्षवेधी लढतीत राष्ट्रवादीचे लक्ष्मण एडके यांनी काँग्रेसचे स्वीकृत नगरसेवक भैय्या उर्फ मोहन कुलकर्णी यांचा मोठ्या फरकाने पराभव केला.  

प्रभाग-8मध्ये राष्ट्रवादीच्या भारती प्रवीण जाधव यांनी नगरसेविका बेबीताई चव्हाण यांचा पराभव केला. राष्ट्रवादीकडून वनिता अरूण साळे, बाळाबाई पांडुरंग मळगे या विजयी झाल्या. काँग्रेसचे विद्यमान नगराध्यक्ष इकबाल गवंडी यांनी राष्ट्रवादीच्या दोन नवख्या उमेदवारांवर सहज मात केली.  गायत्रीदेवी सुजय शिंदे या प्रभाग-2मधून, उपनगराध्यक्ष श्रीकांत शिंदे यांच्या सूनबाई कोमल शिवराम शिंदे या प्रभाग-10 मधून विजयी झाल्या. काँग्रेसचे नामदेव काळे, संतोष कोळी, अश्‍विनी चंद्रकांत माळी विजयी झाले.

भाजपचे माजी उपनगराध्यक्ष उमेश सावंत यांच्या पत्नी दिप्‍ती सावंत यांनी काँग्रेस नगरसेविका मंदाकिनी बेळुंखी यांचा पराभव केला. भाजपकडून प्रमोद हिरवे, प्रकाश माने, श्रीदेवी मल्‍लीकार्जुन सगरे, जयश्री दीपक शिंदे, विजय शिवाजी ताड हे  प्रथमच सभागृहात येत आहेत.

विद्यमान सहा नगरसेवक व त्यांच्या तीन नगरसेवकांना पराभवाचा धक्‍का बसला. महादेव कोळी, परशुराम मोरे, बेबीताई चव्हाण, मंदाकिनी बेळुंखी, माया साळे हे काँग्रेसचे व  अपक्ष म्हणून निवडणूक लढविणारे गिरमल कांबळे पराभूत झाले. काँग्रेसमधून निवडणूक लढविलेले भैराप्पा माळी, राष्ट्रवादीमधील आनंद कबीर कांबळे व अपक्ष पापा कुंभार या नगरसेवकांच्या नातेवाईकांचाही पराभव झाला.