Thu, Jan 24, 2019 07:39होमपेज › Sangli › मनरेगा कामांसाठी पंचायत समितीस टाळे

मनरेगा कामांसाठी पंचायत समितीस टाळे

Published On: Jan 07 2018 2:03AM | Last Updated: Jan 06 2018 11:00PM

बुकमार्क करा
जत: प्रतिनिधी

जत तालुक्यात वर्षभरापासून मनरेगाची कामे बंद आहेत. मागील कामांची सात कोटींची बिले थकित आहेत. थकित बिले देऊन नवीन कामे तातडीने सुरू न केल्यास पंचायत समिती कार्यालयास टाळे ठोकू, असा इशारा आमदार विलासराव जगताप यांनी पत्रकार बैठकीत दिला. जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील उपस्थित होते. आमदार जगताप म्हणाले, तालुक्यात वर्षभरात सुमारे 25 कोटी रुपयांचा निधी रोजगार हमी योजनेवर खर्च होतो. मात्र तालुक्यात गेल्या वर्षभरात रोजगार हमीचे एकही काम झालेले नाही. जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत अडसूळ व गटविकास अधिकारीच याला जबाबदार आहेत.

तालुक्यात झालेल्या कामांची सात कोटींची बिले वर्षभरापासून थकित आहेत. ही बिले देण्याची वारंवार मागणी केली. मात्र ती देण्यास टाळाटाळ केली जात आहे. अधिकार्‍यांमध्ये दोन गट निर्माण झाले आहेत. त्याला मुख्य कार्यकारी अधिकारीही पाठीशी घालत आहेत. या वादातूनच ग्रामसेवकांचा महिनाभरापासून संप सुरू आहे. या सर्व प्रकारास जबाबदार असलेल्या अधिकार्‍यांवर तातडीने कारवाई करावी, तशीच नवीन कामे सुरू करावीत, अन्यथा आम्ही पंचायत समितीचे कामकाज चालू देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.