होमपेज › Sangli › जनता दल ते भाजप ; महापौर संगीता खोत यांचा राजकीय प्रवास

जनता दल ते भाजप ; महापौर संगीता खोत यांचा राजकीय प्रवास

Published On: Aug 20 2018 5:48PM | Last Updated: Aug 20 2018 5:48PMसांगली :  अमृत चौगुले

महापौरपदाची संधी लाभलेल्या संगीता खोत यांचा जनता दल ते विविध आघाड्यामार्गे भाजप असा विविध पक्षांतून राजकीय प्रवास झाला आहे. चौथ्या टर्ममध्ये त्यांना नगरसेवकपदाबरोबरच भाजपकडून महापौरपदाची संधी मिळाली. 

वेगवेगळ्‍या समित्‍यांचे, सदस्‍य,  सभापती म्‍हणून  काम

संगीता खोत जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष विठ्ठल खोत यांच्या पत्नी  आहेत.  त्यांना २००३ मध्ये पहिल्यांदा जनता दलातून नगरसेविकापदाची संधी मिळाली. त्यानंतर २००८ मध्ये काँग्रेसविरोधात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्या पुढाकाराने सर्वपक्षीय विकास महाआघाडी करण्यात आली होती. यामध्ये जनता दलाचाही सहभाग होता. त्यानुसार कुपवाडमधून त्या महाआघाडीतून निवडून आल्या. त्या काळात त्यांनी प्रभाग समिती, महिला बालकल्याण समिती सभापती, स्थायी समिती सदस्य म्हणूनही काम केले. 

वाचा : सांगलीच्‍या महापौरपदी भाजपच्‍या संगीता खोत

पुन्हा २०१३ मध्ये काँग्रेस, राष्ट्रवादीच्या विरोधात माजी आमदार संभाजी पवार, प्रा. शरद पाटील यांनी स्वाभिमानी विकास आघाडी निर्माण केली. यामध्ये संगीता खोत या स्वाभिमानी आघाडीतून निवडून आल्या. त्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीच्या मदतीने प्रभाग समिती सभापती, स्थायी समिती सदस्या, म्हणून काम केले. 

महापालिका निवडणुकीपूर्वी भाजपमध्‍ये प्रवेश

मात्र या महापालिका निवडणुकीपूर्वी संगीता खोत यांनी मिरजेतील आजी-माजी १५ हून अधिक नगरसेवकांसमवेत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांनी मिरजेच्या प्रभाग ७ मधून ओबीसी महिला गटातून निवडणूक लढविली होती. यामध्ये त्यांनी धोंडुबाई कलगुटगी यांचा पराभव केला.  

भाजपकडून ओबीसी महिला महापौरपदासाठी त्यांच्यासह  सविता मदने, अनारकली कुरणे,  गीता सुतार, उर्मिला बेलवलकर, कल्पना कोळेकर आदी आठजण इच्छुक होत्या. त्यातून ज्येष्ठत्वाच्या निकषातून भाजपकडून त्यांना संधी देण्यात आली. त्यामुळे जनता दल ते भाजपमधून आघाडी अशा प्रवासातून त्या महापौरपदी विराजमान झाल्या.

भाजपच्या पहिल्या महापौर

महापालिकेत काँग्रेस-राष्ट्रवादीचा पराभव करून भाजपने विरोधकांचे शेवटचे सत्ताकेंद्र काबिज केले. यामध्ये भाजपच्या नगरसेविचका म्हणून संगीता खोत यांचाही सहभाग आहे. त्यानुसार महापालिका स्थापनेपासून पहिल्यांदाच भाजपचा महापौर होत आहे. त्यामध्ये पहिल्याच महापौरपदाची संधी संगीता खोत यांना मिळाली.  महापालिकेच्या त्या १६  व्या महापौर बनल्या आहेत.