सांगली : प्रतिनिधी
शेतीमालाच्या भावासाठी शेतकरी सुकाणू समितीतर्फे सोमवार 14 रोजी राज्यात प्रत्येक जिल्ह्यात जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. ऊस दराचा उर्वरित हप्ता न दिल्यास उग्र आंदोलन केले जाईल, असेही ते म्हणाले.
त्यांनी सांगितले की, सरकार भाजपचे असो किंवा काँग्रेसचे कोणीही शेतकरी हिताची नव्हे; तर उद्योगपतींच्या बाजूची भूमिका घेतली. सत्तेवर येण्यापुर्वी प्रत्येक पक्ष शेतकर्यांवर आश्वासनांची खैरात करतो. पण सत्तेवर आल्यानंतर त्या पक्षाला केलेल्या घोषणांचा विसर पडतो. भाजपने शेतीमालास दीडपड हमीभाव देण्याची घोषणा केली होती. पण केंद्र व राज्य सरकारने हमीभाव दूरच शेतकर्यांसाठी काहीही केले नाही. ऊस आणि दूध उत्पादक शेतकर्यांची तर शासनाने परवड केली आहे.
शेतीमालास हमीभाव मिळावा यासाठी शेतकरी संघटनेने नुकतीच राज्यभर शहीद अभिवादन यात्रा काढली. त्याला शेतकर्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात आता जेलभरो आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात येणार आहे. डी.जी. माळी, वंदना माळी यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.