Tue, Apr 23, 2019 01:35होमपेज › Sangli › रघुनाथ पाटीलसह कार्यकर्त्यांचा जेलभरो

रघुनाथ पाटीलसह कार्यकर्त्यांचा जेलभरो

Published On: May 15 2018 1:34AM | Last Updated: May 15 2018 12:15AMसांगली : प्रतिनिधी

शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांनी सोमवारी येथे जेलभरो आंदोलन केले. शेतीमालास हमी भाव न देणार्‍या सरकार विरोधात घोषणाबाजी करीत  जाहीर निषेध व्यक्त केला. दरम्यान रघुनाथदादा पाटील यांच्यासह  संघटनेच्या 36 कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करून त्यांना सोडून  देण्यात आले. शेतकरी सुकाणू समितीतर्फे आज राज्यात  जेलभरो आंदोलन करणार असे जाहीर केले होते.  त्यानुसार येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात सकाळी दहा वाजता मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त होता. 

दुपारी साडेबाराच्या दरम्यान  पाटील यांच्यासह हणमंत पाटील, शंकर मोहिते, महादेव कोरे, माणिक पाटील, अविनाश पाटील, भाऊसाहेब पवार, माणिक माळी आदी कार्यकर्ते आले.  पाटील म्हणाले,   भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या सरकारने शेतकरी हिताची नव्हे; तर उद्योगपतींच्या बाजूची भूमिका घेतली आहे. ते म्हणाले, भाजपने शेतीमालास दीडपड हमीभाव देण्याची घोषणा केली होती. पण केंद्र व राज्य सरकारने हमीभाव दूरच शेतकर्‍यांसाठी काहीही केले नाही. ऊस आणि दूध उत्पादक शेतकर्‍यांची  शासनाने परवड केली आहे.  

आंदोलकांनी सरकारचा धिक्कार असो, अशा घोषणा देताच पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेतले. सर्वांना विश्रामबाग पोलिस ठाण्यात  तीन तास थांबवून ठेवले. त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करुन त्यांना सोडून देण्यात आले.  दरम्यान आंदोलनात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांना परवानगीशिवाय आंदोलन केल्याने नोटीसा काढल्या आहेत. 

जिल्हाधिकारी कार्यालय आवारात कडक बंदोबस्त

शेतकरी संघटनेच्या आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात प्रचंड पोलिस बंदोबस्त होता.  सुमारे शंभरावर पोलिस या ठिकाणी उपस्थित होते. अनुचित प्रकार टाळण्यासाठी साध्या गणवेशातील पोलिसही आवारात होते.