होमपेज › Sangli › इस्लामपूर शहर विकासाचे ‘रोल मॉडेल’ बनविणार

इस्लामपूर शहर विकासाचे ‘रोल मॉडेल’ बनविणार

Published On: Dec 29 2017 1:31AM | Last Updated: Dec 28 2017 8:08PM

बुकमार्क करा
इस्लामपूर : मारूती पाटील

विकास आघाडी व मित्र पक्ष शिवसेनेच्या पालिकेतील सत्तेला वर्षपूर्ती होत आहे. या वर्षभराच्या कालावधीत आम्ही शहराच्या विकासासाठी 100 कोटीहून अधिक रुपयांचा निधी मंजूर करून आणला. त्यातील काही कामे पूर्ण झाली आहेत. तर काही सुरू आहेत. येत्या 4 वर्षात इस्लामपूर शहराचा चेहरामोहरा बदलून जनतेने आमच्यावर दाखविलेला विश्‍वास सार्थ ठरवू, असे नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी दै. ‘पुढारी’शी बोलताना स्पष्ट केले. इस्लामपूर शहर हे भविष्यात विकासाचे ‘रोल मॉडेल’ असेल असेही ते म्हणाले. 

नगराध्यक्ष पाटील म्हणाले, गेल्या 31 वर्षांच्या एकाधिकारशाहीला  कंटाळून शहरवासियांनी  ऐतिहासिक सत्तांतर केले. या सत्तांतराची चर्चा संपूर्ण राज्यात झाली. शहरातील जनतेच्या मूलभूत गरजा पुरविण्यात आम्ही यशस्वी झालो असून, नागरिकांच्यातून 1 वर्षाच्या कारभारावर समाधान व्यक्त होत आहे. शहरातील नागरिकांनी थेट नगराध्यक्ष म्हणून माझी निवड केल्यामुळे शहराचा कुटुंबप्रमुख म्हणून मला काम करताना विशेष आनंद होत आहे. यानिमित्ताने मी गेले वर्षभर थेट नागरिकांच्यापर्यंत पोहोचून त्यांच्या नगरपालिका स्तरावरील व शासनस्तरावरील अडचणी व प्रश्‍न जाणून घेतले. 80 टक्क्यापेक्षा जास्त समस्या मी सोडवू शकलो. सुरुवातीपासूनच गट-तट बाजूला ठेवून येणार्‍यांच्या योग्य कामाला प्राधान्य देणे या विचारानेच नगराध्यक्ष दालनात प्रवेश केला. नगराध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर प्रशासनस्तरावरील, शासनस्तरावरील अडचणी व प्रलंबित विषयाची माहिती घेत कामकाजाला सुरूवात केली.  पालिकेतील अधिकारी-कर्मचारी यांची विभागानिहाय बैठक घेतली. नागरिकांच्या शंकेचे निरसन करून कामाची पूर्तता कमी वेळेत करण्याच्या  दृष्टीने कामकाज असायला हवे, अशा सूचना दिल्या. दिवसभरात 200 ते 250 लोक कामानिमित्त येतात. त्यांच्या चेहर्‍यावरील समाधान हेच माझ्या कामाचे प्रतीक आहे.

नगराध्यक्ष आपल्या दारी...

पाटील म्हणाले, ‘नगराध्यक्ष आपल्या दारी’ याची वचनपूर्ती करताना शहरात कानाकोपर्‍यात पोहोचलो.  अनेक वर्षांपासून तत्काळ सुटण्यासारखे प्रश्‍नही आधीच्या  सत्ताधार्‍यांनी सोडविले नाहीत. याबाबत अनेक नागरिक परखडपणे बोलत होते. तर आमच्याकडे प्रथमच नगराध्यक्ष आले, असेही स्पष्ट बोलत होते. अनेक रस्ते, गटारीमुळे  जनजीवन विस्कळीत झाले होते. पावसाळ्यात तर नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत होती. अशा स्थितीतही आम्ही रस्ते व गटारींची उपाययोजना केली.  

विकासकामांना सुरुवात...

प्रलंबित असणारा कोळी मळ्यातील रस्ता 26 लाख खर्चून पूर्ण झाला. प्रभाग क्र. 1, 2, 3, 4, 5, 6 या प्रभागात एक वर्षामध्ये एकूण रुपये 4 कोटी 35 लाख 83 हजार 278 इतका निधी खर्च करून विकासकामे साधली. तर 15 कोटी 13 लाख 15 हजार 742 इतक्या निधीची विकासकामे याच प्रभागात सुरू आहेत. 69 कोटी 42 लाख रुपयांच्या  भुयारी गटर योजनेच्या  कामाला सुरुवात झाली आहे. याबरोबर 24/7 पाणी योजना व भुयारी वीजवाहिनी हेही काम लवकरच हाती घेणार आहोत. वाघवाडी, बहे, कामेरी रस्ता व आंबेडकरनगर रस्ता या शहराला जोडणार्‍या चारही रस्त्यांचे  चौपदीकरण करण्यात येणार आहे.  इस्लामपूर ते वाघवाडी या रस्त्याच्या चौपदरीकरणाला सुरुवात झाली आहे.

आरोग्य सेवेवर दीड कोटी...

आपल्या शहरातील व तालुक्यातीलच नव्हे तर जिल्ह्यातील रुग्णांवर मोफत उपचार व्हावेत, या पवित्र हेतूने प्रकाश हॉस्पिटल अ‍ॅण्ड रिसर्च सेंटरमध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजना व प्रकाश आरोग्य योजनेंतर्गत हजारो रुग्णांवर मोफत उपचार करून 1 कोटी 50 लाख  रुपयांची वर्षभरात मोफत आरोग्य सेवा पुरविण्यात आली.

भविष्यातील योजना...

नगराध्यक्ष पाटील म्हणाले, राज्यातील 230 नगरपरिषदेमध्ये आपल्या नगरपरिषदेचा दुसरा क्रमांक लागतो. लवकरच 24/7 पाणीपुरवठा योजना, वाहतूक व्यवस्था, रस्ते, पार्किंगसाठी वाहनतळ, पंतप्रधान आवास योजनेंतर्गत उरुण-इस्लामपूर झोपडपट्टी मुक्त करणे यासह अन्य विविध योजना राबविण्यात येणार आहेत. शैक्षणिक, क्रीडा व साहित्य क्षेत्रातही रहिवाशांना वाव मिळावा, यासाठी उपक्रम राबविण्याचा माझा मानस आहे.