Fri, Jul 19, 2019 07:09होमपेज › Sangli › अरुंद रस्ते, अतिक्रमणातून इस्लामपूरची ‘वाट (?)’

अरुंद रस्ते, अतिक्रमणातून इस्लामपूरची ‘वाट (?)’

Published On: Feb 09 2018 2:02AM | Last Updated: Feb 08 2018 7:26PMइस्लामपूर : अशोक शिंदे

झपाट्याने वाढत असलेल्या इस्लामपूर शहरामध्ये वाहतुकीची वर्दळदेखील मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यामुळे पालिकेतील सत्ताधार्‍यांसमोर वर्षानुवर्षे अरुंद असणार्‍या आणि अतिक्रमणांच्या विळख्यात असलेल्या रस्त्यांचा ‘श्‍वास’ मोकळा करण्याचे आव्हान आहे. 

सन 1985 च्या आधी दोन-तीन दशके तत्कालीन नगराध्यक्ष (स्व.) एम. डी. पवार यांची सलग एकहाती सत्ता होती.  सन 1980 च्या शहर विकास आराखड्याप्रमाणे शहरातील रस्त्यांसह नागरी सुविधांची रचना होती. त्यावेळची आरक्षणे, त्यानंतर अलिकडे राष्ट्रवादीच्या सत्तेच्या 31 वर्षाच्या काळात झालेली स्थित्यंत्तरे,  अद्यापही विकसित न झालेल्या आरक्षित जागा, मध्यंतरीच्या काळात कार्यवाहीत अडकलेला नवीन विकास आराखडा; अशा अनेक घटनांक्रमांतून  सुनियोजित विकास हेलकावत आहे. 

सांगली - तासगाव - विटा - कराड - शिराळा व वारणानगर; अशा ठिकाणांपासून सर्वसाधारण समान अंतरावर असणार्‍या सधन पट्ट्यातील इस्लामपूर झपाट्याने विस्तारत आहे. दररोज नवनव्या दुचाकी - चारचाकी वाहनांची शहरात भर पडत आहे. 

शिक्षण, व्यापार, उद्योग व परिसरातील शेती-सहकार क्षेत्राच्या विकासाने  गर्दी वाढत आहे. वर्षानुवर्षे अरुंद असणार्‍या रस्त्यांवर अतिक्रमणांचा ठिकठिकाणी विळखा आहे. प्रामुख्याने यल्‍लामा चौक - गांधी चौक ते (लाल चौक-संभाजी चौक) मार्गे बसस्थानक मार्ग तसेच बहे व ताकारी नाक्यापासून आष्टा नाक्यापर्यंत आणि पोस्ट ऑफिस ते शिराळा नाका मार्ग हे प्रमुख मार्ग असून या ठिकाणी अरुंद रस्ते आणि अतिक्रमणांचा विळखा आहे. 

नागरिक व व्यावसायिकांनीदेखील स्वयंशिस्तीला प्राधान्य देण्याची गरज आहे. दररोजची वाढती गर्दी व वाहतुकीच्या कोंडीला आळा घालण्यासाठी पालिका व वाहतूक पोलिस शाखा आपल्या परीने प्रयत्न करीत आहे. परंतु मुलभूत समस्या कायम आहे.

पेठ - सांगली रस्त्याकडे शहरातून जाणार्‍या रस्त्यांची रुंदी अथवा आराखड्यातून नवे रस्ते बनणे आवश्यक आहे. भविष्यात नुसत्या विकासाच्या गप्पा मारण्यापेक्षा मुलभूत सोयी-सुविधांवर तसेच प्रमुख चौकांच्या विस्तारीकरणांवर, शहरातून बाहेर पडणार्‍या बहे-ताकारी-पेठनाका मार्गावर रस्ता दुभाजकांची व्यवस्था करण्यावर भर देणे आवश्यक आहे. तरच खर्‍या अर्थाने शहर विकासाचे महत्त्वपूर्ण पाऊल पडू शकते. अशीच शहरवासियांतून प्रतिक्रिया उमटू लागली आहे.