इस्लामपूर : वार्ताहर
बेवारस म्हणून पोलिसांनी उचलून नेलेली मोटारसायकल येथील पोलिस ठाणे परिसरातून कुणीतरी चोरून नेली आहे. या मोटारसायकलची मागणी करण्यासाठी गेलेल्या मालकाला पोलिस काहीच दाद देत नाहीत. त्यामुळे शोध कुठे घ्यायचा, असा प्रश्न मोटारसायकल मालकापुढे आहे. दोन महिन्यांपूर्वी येथील बसस्थानकासमोरील रस्त्याकडेला रात्री पोलिसांना एक बेवारस मोटारसायकल (एम.एच.10/सीजी 5142) आढळून आली होती. ती पोलिसांनी उचलून पोलिस ठाण्यात नेली. ही मोटारसायकल चिकुर्डे (ता. वाळवा) येथील अमर अरुण गुरव यांची होती.
रात्री बसस्थानकासमोर मोटारसायकल बंद पडल्याने ती तेथेच ठेवून गुरव गावाकडे गेले होते. दुसर्या दिवशी त्यांना तेथून मोटारसायकल गायब झाल्याचे दिसले.वाहतूक पोलिसांनी मोटारसायकल नेली असेल म्हणून गुरव पोलिस ठाण्यात गेले. तेथे मोटारसायकल होती. पोलिसांनी त्याला गाडीची कागदपत्रे घेऊन येण्यास सांगितले. मात्र कागदपत्रे फायनान्स कंपनीकडे होती. ती मिळविण्यासाठी दोन महिने लागले. ती मिळाल्यानंतर गुरव गाडी घेण्यासाठी पोलिस ठाण्यात गेले तेव्हा तिथे गाडीच नव्हती. पोलिस आता दाद देत नाहीत असे त्यांचे म्हणणे आहे.
पेट्रोल, पार्टनंतर आता गाडीही चोरीस...
इस्लामपूर पोलिस ठाणे परिसरात लावलेल्या गुन्ह्यातील व चोरीतील मोटारसायकलमधील पेट्रोल व गाड्यांचे पार्ट चोरीस जाण्याचे प्रकार नेहमीच घडतात. मात्र मोटारसायकलच चोरीस जाण्याचा हा पहिलाच प्रकार असावा. पोलिस ठाण्याबाहेर पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. त्याचे फुटेज पाहिले असता चोरीचा हा प्रकार उघडकीस येवू शकतो.