Thu, Aug 22, 2019 08:12होमपेज › Sangli › हल्‍लाबोल यात्रेत अजितदादांनी दिले डोस

हल्‍लाबोल यात्रेत अजितदादांनी दिले डोस

Published On: Apr 07 2018 2:04AM | Last Updated: Apr 06 2018 11:50PMइस्लामपूर  : अशोक शिंदे 

इस्लामपूर पालिका निवडणूक व शिराळा विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादीचा झालेला पराभव पक्षाच्या चांगलाचा जिव्हारी लागल्याचे नेते अजित पवार यांच्या भाषणातून जाणवले. इस्लामपुरातील ‘हल्‍लाबोल’ सभेमध्ये त्यांनी सांगली जिल्ह्यात राष्ट्रवादीचे आमदार कमी असतानाही राज्यस्तरावर दिलेल्या भरीव प्रतिनिधीत्वाप्रमाणे पक्षाचे काम झाले नसल्याचाही उल्‍लेख केला. 

वर्षानुवर्षे इस्लामपूर पालिकेत असलेल्या  आ. जयंत पाटील यांच्या सत्तेला 31 वर्षानंतर हादरा बसला. त्याचा चांगलाच धसका राष्ट्रवादीने घेतल्याचे अजित पवार यांच्या मनोगतातून दिसून आले. येथील जयंत पाटील खुल्या नाट्यगृहात हजारोंच्या गर्दीने सभेस उच्चांक गाठला होता. महागाई, दारिद्य्र, शेतमालाला हमीभाव, फोडाफोडीचे व भ्रष्ट राजकारण, खोट्या घोषणा, अच्छे दिनचा बोजवारा; या अनुंषगाने व्यासपीठावरून अजित पवार, आ. धनंजय मुंडे, पक्षाध्यक्ष सुनील तटकरे व आ. जयंत पाटील यांनी केंद्र व राज्यातील सत्तेवर टीकास्त्र सोडली. 

त्याचबरोबर प्रामुख्याने पवार यांनी आपल्या भाषणात बारामतीच्या विविध निवडणुकांचा तपशील देताना सांगितले की, जिल्हा परिषद- पंचायत समिती- पालिका अशा सर्व निवडणुकांत मोठ्या मताधिक्याने राष्ट्रवादी एकतर्फी विजयी होत असते, असे सांगून ते म्हणाले, आ. जयंतरावांनी इस्लामपूरला काय कमी दिले? राजारामाबापू कारखाना, दूध संघ, बँक, सूतगिरणी, शिक्षणसंस्था, यांच्या विस्तारासह शहरात अनेक विकासकामे केली. त्यांच्या उद्घाटनांनाही आम्ही आलो. तरी सुध्दा तुम्ही त्यांना साथ का दिली नाही, आता यापुढे चुका करू नका, गेले ते कावळे व राहिले ते मावळे.

शिराळा मतदार संघात मानसिंगराव नाईक यांच्या झालेल्या पराभवाविषयी बोलताना अजितदादा परखडपणे म्हणाले, वाळव्याच्या परिसरातील गावांनी साथ न दिल्याने राष्ट्रवादी हरली. आता आम्ही दोन-चारजण निवडून येऊन राज्यात सत्ता येणार नाही. संबंध सांगली जिल्ह्यात, परिसरातील सर्व आमदार राष्ट्रवादीचेच आले पाहिजेत. इस्लामपुरातील हल्लाबोल यात्रेच्या गर्दीमुळे राष्ट्रवादीमध्ये उत्साहाचे वातावरण होते. यामुळे राष्ट्रवादी चांगलीच रिचार्ज झाली आहे.

गर्दीत जयंतराव....!

इस्लामपुरात झालेल्या सभेआधी आ. जयंत पाटील हे आपल्या नेहमीच्या ‘सर्कलला’ बाजूला करून सभेच्या ठिकाणच्या अनेक लोकांशी अधून-मधून फिरून आस्थेने संवाद साधत होते. याआधी देखील नेते चांगले आहेत पण त्यांच्या आजूबाजूच्या बगलबच्चांविषयी उलट-सुलट प्रतिक्रिया असायच्या. त्या पार्श्‍वभूमीवर नेत्यांनी साधलेल्या या संवादाला जनतेने कधी हस्तांदोलन तर कधी सेल्फीव्दारे दाद दिली.