Wed, May 22, 2019 15:17होमपेज › Sangli › माहिती अधिकारावरून आढावा बैठकीत जुंपली

माहिती अधिकारावरून आढावा बैठकीत जुंपली

Published On: Dec 03 2017 1:25AM | Last Updated: Dec 02 2017 10:16PM

बुकमार्क करा

इस्लामपूर ः वार्ताहर

माहिती अधिकाराचा वापर करून  शासकीय अधिकार्‍यांना जाणीवपूर्वक त्रास देणार्‍यांची माहिती  माहिती अधिकार्‍यांना द्या. त्यांच्यावर कारवाई करायला लावू. चांगल्या कामांना अडथळा आणणार्‍यांची गय केली जाणार नाही, असा इशारा कृषि राज्यमंत्री ना. सदाभाऊ खोत यांनी दिला. त्यामुळे शनिवारी येथे आढावा बैठकीत ना. खोत व बळीराजा शेतकरी संघटनेचे बी. जी. पाटील यांच्यात शाब्दिक खडाजंगी झाली.

ना. खोत यांनी सांगली येथे माहिती अधिकाराखाली माहिती मागवून शासकीय अधिकार्‍यांना त्रास देणार्‍यांवर गुन्हेे दाखल केले जातील, असे सांगितले होते. त्यामुळे आजच्या आढावा बैठकीत पाटील यांनी याबाबत ना. खोत व कृषी विभागाच्या अधिकार्‍यांकडे विचारणा केली. 

‘विनाकारण आमची बदनामी करू नका, गैरसमज पसरवू नका, तुम्ही बदनाम झालाय, आम्हालाही बदनाम करू नका. उगीच माहिती मागयला आम्ही  खुळे आहोत काय? असे पाटील यांनी कृषी विभागाच्या अधिकार्‍यांना खडसावले. महावितरण  अधिकार्‍यांनी निधी मिळत नसल्याने अडचणी असल्याचे सांगितले. यावर  पाटील यांनी मंत्री येथे आहेत. निधी मागा,  असे त्यांना सांगितले. यावर ना. खोत   पाटील यांना म्हणाले, ‘काका, भाषण करू नका, तक्रारी मांडा’, असे सुनावले. यावरून पुन्हा दोघांत शाब्दिक वादही झाला.

 तक्रारी येतात म्हणून कामे थांबवू नका. सरकार म्हणून मी तुमच्या पाठीशी आहे. चांगले काम करीत असाल तर कोणाला भ्यायची गरज नाही, असेही ना. खोत यांनी शासकीय अधिकार्‍यांना सांगितले. 
पाटील यांनी एकाच घरातील कितीजणांना शासकीय अनुदान घेता येते, असा सवाल कृषी अधिकार्‍यांना केला. कामेरी येथे एका शेतकर्‍याचे अनुदान दुसर्‍याच शेतकर्‍याच्या नावे उचलले आहे. मृत व्यक्तीच्या नावे अनुदान उचलल्याचे त्यांनी ना. खोत यांच्या निदर्शनास आणून दिले. 

पॉली हाऊस उभारलेल्या शेतकर्‍यांनी माहितीच्या अधिकाराखाली काहींनी माहिती मागविल्याने कृषी विभागाने आमचे अनुदान रोखल्याचे ना. खोत यांना सांगितले. यावर खोत यांनी हे अनुदान तातडीने वर्ग करण्याच्या सुचना दिल्या. हरित लवादाने बंदी घातली असतानाही शिवपुरी येथे डोंगरात अवैध उत्खनन सुरू असल्याचे  पाटील यांनी सांगितले. यावर ना. खोत यांनी तुम्ही तक्रार द्या, महसूल विभागाला कारवाई करावयास सांगू, असे सांगितले.  पाटील यांनी तुम्ही शासकीय अधिकार्‍यांचा पगार वाढवा; मी तक्रार देऊन लोकांचा वाईटपणा घेऊ काय, असा सवाल ना. खोत यांना केला.