Fri, May 24, 2019 03:13होमपेज › Sangli ›  सातत्यामुळे इस्लामपूर पालिकेला पुरस्कार

 सातत्यामुळे इस्लामपूर पालिकेला पुरस्कार

Published On: Jun 25 2018 1:52AM | Last Updated: Jun 25 2018 12:11AMइस्लामपूर : मारूती पाटील

स्वच्छ सर्वेक्षण अभियानात इस्लामपूर नगरपालिकेचा देशात 17 वा तर राज्यात 8 वा क्रमांक आल्याने पालिकेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. यापुर्वी पालिकेचा संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात राज्यात पहिला क्रमांक आला होता. तर दोन वर्षापुर्वी  पालिकेला स्वच्छ महाराष्ट्र अभियानातही हागणदारीमुक्‍त शहराचा पुरस्कार मिळाला आहे. 

केवळ अभियानापुरते पालिकेने स्वच्छतेकडे लक्ष केंद्रीत केले नाही तर त्यामध्ये नेहमीच सातत्य ठेवले आहे. यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्ता काळात पालिकेला सन 2009 ला स्वच्छता अभियानात पहिला क्रमांक मिळाला होता. दोन वर्षापूर्वी हागणदारीमुक्‍त शहर म्हणूनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पालिकेला सन्मानित केले. सप्टेंबर 2015 मध्ये इस्लामपूर शहर हे देशातील पहिले मोफत वाय-फाय शहर झाले.

माजी मंत्री आ. जयंत पाटील यांनी मंत्रीपदाच्या काळात शहरासाठी विशेष निधी आणला. त्यातून शहरात अंबिका, कुसमागंध, शेतकरी आदी उद्याने उभी राहिली. तर काही उद्यानांची कामे सुरू आहेत. जिल्ह्यात इस्लामपूर पालिकेनेच पहिल्यांदा गॅस शवदाहिनी उभा केली. घनकचरा प्रकल्पही सुरू आहे.  सातत्याने नवनवे उपक्रम राबविण्यात इस्लामपूर पालिका नेहमीच अग्रेसर असते. सध्याच्या नव्या सत्ताधार्‍यांनीही ही परंपरा पुढे कायम ठेवली आहे.

स्वच्छ सर्वेक्षण अभियानात सत्ताधार्‍यांना विरोधकांनीही राजकारण बाजूला ठेवून चांगले सहकार्य केले. नगराध्यक्ष निशिकांत पाटील, उपनगराध्यक्ष दादासो पाटील, मुख्याधिकारी दीपक झिंजाड, पक्षप्रतोद विक्रम पाटील, नगरसेवक आनंदराव पवार, वैभव पवार, शहाजी पाटील, खंडेराव जाधव, विश्‍वास डांगे, डॉ. संग्राम पाटील आदींसह सर्व नगरसेवक, अधिकारी, कर्मचार्‍यांनी विशेष परिश्रम घेतल्याने हे यश पालिकेला मिळाले.