Wed, Apr 24, 2019 07:35होमपेज › Sangli › डोक्यात दगड घालून एकाचा खून

डोक्यात दगड घालून एकाचा खून

Published On: Jan 21 2018 2:53AM | Last Updated: Jan 21 2018 1:07AMइस्लामपूर : शहर वार्ताहर   

कचरा टाकल्याच्या किरकोळ वादातून येथील बुरूड गल्लीतील संजय रामचंद्र वडे (वय 45) यांच्या डोक्यात दगड घालून निर्घृण खून करण्यात आला.  खुनाचा प्रकार शुक्रवारी रात्री एमआयडीसी परिसरात घडला.  याप्रकरणी संशयित आरोपी नीलेश शिवाजी सपाटे (रा. यल्लामा चौक, इस्लामपूर) याच्यावर इस्लामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला  आहे. संशयित सपाटे फरारी असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.  पोलिसांकडून  व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, संजय  यांचा भाऊ दशरथ व संशयित  निलेश सपाटे येथील बुरूड गल्लीत शेजारी-शेजारी राहतात. घराशेजारी कचरा टाकण्याच्या कारणांवरून या दोन्ही कुटुंबात वारंवार वाद होत असे. त्यातूनच परस्परांत वैमनस्य निर्माण झाले होते. दोन दिवसांपूर्वी याच वादातून दशरथ यांच्या पत्नी पूनम यांना नीलेश याने शिवीगाळ केली होती. याप्रकरणी पोलिसांत अदखलपात्र गुन्ह्याची नोंद झाली होती.

संजय वडे हे शहरातील एका कापड दुकानात काम करीत. काही महिन्यांपूर्वी त्यांची हृदय शस्त्रक्रिया झाली होती. ते औषधोपचारासाठी शुक्रवारी सकाळी 7 च्या सुमारास पत्नीबरोबर सांगलीला गेले होते. दोघेही सायंकाळी घरी परतले. संजय , ‘मी फिरून येतो’ असे सांगून ते घरातून बाहेर पडले. रात्री उशिरापर्यंत ते घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी त्यांची शोधाशोध   सुरू केली होती. रात्री उशिरापर्यंत त्यांचा शोध न लागल्याने वडे कुटुंबियानी पोलिसांत ते बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. शनिवारी सकाळी घरच्यांनी येथील मंत्री कॉलनीतील वडे यांचे मित्र शरद पाटील यांच्याकडे चौकशी केली. त्यावेळी पाटील यांनी शुक्रवारी रात्री 10.30 च्या सुमारास संजय व निलेश या दोघांमध्ये वादावादी झाली होती, असे  कुटुंबियांना सांगितल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

मृतदेह रात्रभर रस्त्यालगत...

शनिवारी सकाळी इस्लामपूर-बहे रस्त्यालगत दूध संघ परिसरात डोक्यात दगड घालून अज्ञाताचा खून झाल्याची बातमी शहरात पसरली. मृतदेह रस्त्यालगतच्या झुडपात पडला होता.  शेजारी रक्ताने माखलेला दगड होता. पोलिस निरीक्षक प्रताप मानकर आदींनी घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह संजय वडे यांचा असल्याचे स्पष्ट झाले. मुलगा गणेश वडे यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.  निरीक्षक  मानकर  तपास करीत आहेत. दुपारी श्‍वान पथक घटनास्थळी आणले. परंतु काही सुगावा लागला नाही. वडे यांच्या मृतदेहाचे येथील उपजिल्हा रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. दुपारी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. सायंकाळी वडे यांच्यावर शोकाकूल वातावरणात  अंत्यसंस्कार करण्यात आले. वडे यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुले, मुलगी असा परिवार आहे.