Fri, Jul 19, 2019 05:14होमपेज › Sangli › शेती पाणीपट्टीची मनमानी वसुली

शेती पाणीपट्टीची मनमानी वसुली

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

वाळवा : धन्वंतरी परदेशी

वाळवा तालुक्यामध्ये कृष्णा नदीकिनारी असणार्‍या पाणी उपसा करणार्‍या योजनांकडून मार्च अखेरच्या नावाखाली पाटबंधारे विभागाकडून पठाणी वसुली केली जात असून पाणी योजनेचे सभासद, शेतकरी वैतागले आहेत. या असंतोषाचा भडका लवकरच बाहेर पडण्याची शक्यता व्यक्त होत आहे. 

कृष्णा नदी कोयना, धोम आदी धरणांमुळे बारमाही वाहती असून  नदीच्या दुतर्फा वाळवा तालुक्यात शेकडो सहकारी व खासगी पाणी योजना शेतीसाठी पाणी उपसा करतात. त्याची शासकीय पाणीपट्टी नियमितपणे  शेतकरी आणि संस्था भरतात. मात्र यातील काही पाणी संस्था नोंदणीकृत तर काही अनोंदणीकृत आहेत. शासकीय पाणीपट्टी भरूनही संबंधित पाटबंधारे विभागाचे अनेक अधिकारी आणि कर्मचारी मात्र शेतकरी आणि संस्थांकडून नियमांचा धाक दाखवून अतिरिक्त वसुली करत आहेत. 

काही संस्थांचे सिंचनक्षेत्र कमी दाखविले जाते. तर काही संस्थांचे सिंचनक्षेत्र जास्त आहे. बर्‍याच पाणी संस्थांचे विहिरी किंवा इतर सिंचन क्षेत्र तसेच त्यांच्या स्वत:च्या पाणी योजना उभा करतात. त्यामुळेही मूळच्या संस्थेचे क्षेत्र कमी होते. तरीसुद्धा अधिक क्षेत्राची पाणीपट्टी वसूल केली जाते. तर त्यांना कायदेशीर धाक दाखवून प्रत्यक्षात असणार्‍या क्षेत्राची पाणीपट्टी वसूल केली जाते. अन्यथा त्यांच्याकडून शासकीय रकमेपेक्षा अधिक रक्कम उकळली जात आहे. 

वाळवा तालुक्यात विशेषत: वाळवा परिसरात अशी वसुली बिनबोभाटपणे होत आहे. आधी शासकीय वसुली आणि त्यानंतर हप्‍ता वसुली केली जाते. यामुळे एका बाजूला शासनाची फसवणूक तर दुसर्‍या बाजूला पाणी संस्थांची आणि शेतकर्‍यांची लुबाडणूक राजरोसपणे केली जात आहे. वाढती पाणीपट्टी, न परवडणारे वीज बिल, पैसे भरूनही वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा आणि शासकीय अडवणूक या कात्रीत सापडलेला शेतकरी पुरता हैराण झाला आहे. त्यातच पाटबंधारे खात्याकडून केली जात असलेली पठाणी वसुली यामुळे वाळवा तालुक्यातील शेतकरी लवकरच आंदोलनाच्या तयारीत आहे. शासनाने याची चौकशी करावी, अशी शेतकर्‍यांची मागणी आहे.

Tags : Sangli, Sangli News, Irrigation department, misbehave, farmer, water, bill, collection 


  •