Fri, Apr 19, 2019 12:45होमपेज › Sangli › कोयत्याच्या धाकाने दोघांना लुटले

कोयत्याच्या धाकाने दोघांना लुटले

Published On: Jan 24 2018 1:21AM | Last Updated: Jan 24 2018 1:21AMसांगली : प्रतिनिधी

शहरातील आप्पासाहेब पाटीलनगर येथे मोपेडवरून घरी परतणार्‍या दोघांना कोयता, लोखंडी रॉडचा धाक दाखवून लुटण्यात आले. सोमवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास ही घटना घडली. यावेळी चोरट्यांनी दोन तोळ्यांची सोन्याची चेन, पाच हजार पाचशे रुपयांची रोकड असा 65 हजारांचा ऐवज लंपास केला. याबाबत सांगली शहर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. 

याप्रकरणी संकेत सतीश दोशी (वय 32, रा. वखार भाग) यांनी फिर्याद दिली आहे. दोशी त्यांचे मित्र रौनक शहा यांच्यासोबत मोपेडवरून रात्री घरी निघाले होते. मध्यरात्री दोनच्या सुमारास ते आप्पासाहेब पाटीलनगर येथे आले. त्यावेळी वीस ते पंचवीस वयोगटातील तीन तरुण पाठीमागून मोटारसायकलवरून आले. तिघांनीही तोंडाला रुमाल बांधले होते.  तिघांनीही संकेत यांच्या गाडीच्या आडवी गाडी मारून त्यांना थांबविले. त्यानंतर चोरट्यांनी दोघांनाही कोयता आणि लोखंडी रॉडचा धाक दाखवून मारण्याची धमकी दिली. त्यांनी दोघांकडेही रोकड आणि दागिन्यांची मागणी केली. दोशी यांनी भीतीने दोन तोळ्यांची चेन आणि दीड हजार त्यांना दिले. त्यानंतर त्यांचे मित्र शहा यांनीही त्यांच्याकडील चार हजारांची रोकड चोरट्यांना दिली. ऐवज लुटल्यानंतर तिघेही चोरटे मोटारसायकलवरून सुसाट निघून गेले. 

घटना घडल्यानंतर दोशी यांनी तातडीने सांगली शहर पोलिस ठाणे गाठून फिर्याद दिली आहे.