Sun, Mar 24, 2019 16:45होमपेज › Sangli › गुंड भावशाची इस्लामपुरात कसून चौकशी : मोठा पोलिस बंदोबस्त

गुंड भावशाची इस्लामपुरात कसून चौकशी : मोठा पोलिस बंदोबस्त

Published On: May 15 2018 1:34AM | Last Updated: May 15 2018 12:23AMइस्लामपूर : वार्ताहर

रेठरेधरण (ता. वाळवा) येथील गुंड भावशा उर्फ भाऊसाहेब वसंत पाटील याला तपासासाठी सोमवारी इस्लामपूर पोलिस ठाण्यात आणण्यात आले होते. इस्लामपूर पोलिस व गुंडाविरोधी पथकाचे अधिकारी दिवसभर त्याच्याकडे कसून चौकशी करीत होते. भावशा याच्याकडून फरारी काळात झालेले अन्य काही गुन्हेही उघडकीस येण्याची शक्यता आहे. 

गेली 8 वर्षे फरारी असलेल्या भावशा याला शुक्रवारी गुंडाविरोधी पथकाने पंढरपूर येथे अटक केली होती.  रेठरेधरण येथील संताजी खंडागळे यांच्या खूनप्रकरणी इस्लामपूर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. न्यायालयाने त्याला 14 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. सोमवारी तपासासाठी सांगलीहून गुंडाविरोधी पथकाचे कर्मचारी मोठ्या बंदोबस्तात त्याला इस्लामपूर येथे घेऊन आले होते. यावेळी भावशा याचे काही नातेवाईकही पोलिस ठाणे परिसरात थांबून होते.

पोलिस ठाण्यातील बंद खोलीत सकाळी 12 वाजल्यापासून रात्रीपर्यंत त्याची कसून चौकशी सुरू होती. गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष डोके,  पोलिस निरीक्षक प्रताप मानकर त्याच्याकडेच चौकशी करीत होते. फरारी काळात तो कुठे  राहत होता, आणखी कोठे गुन्हे केले आहेत काय? त्याचे अन्य कोण साथीदार आहेत या अनुषंगाने ही चौकशी सुरू होती. भावशा याच्याकडून फरारी काळात चाकण येथेही एकाचा खून झाला आहे. अन्य गुन्हेही त्याच्याकडून उघडकीस येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पोलिसांचे पथक चाकण व अन्य ठिकाणी जाणार आहे.