Sun, Jan 19, 2020 21:19होमपेज › Sangli › लाय डिटेक्टर, ब्रेन मॅपिंगद्वारे गुन्ह्यांचा तपास 

लाय डिटेक्टर, ब्रेन मॅपिंगद्वारे गुन्ह्यांचा तपास 

Published On: Dec 29 2017 1:31AM | Last Updated: Dec 28 2017 11:31PM

बुकमार्क करा
सांगली : प्रतिनिधी

अनिकेत कोथळे खूनप्रकरणानंतर पोलिसांनी ताकही फुंकून पिण्यास सुरुवात केली आहे. कोणत्याही संशयिताला फक्‍त मारहाण करूनच नव्हे, तर अन्य मार्गानेही चौकशी करता येते. त्यामुळे मारहाणीला फाटा देत आता गंभीर गुन्ह्यांतील संशयितांची लाय डिटेक्टर, ब्रेन मॅपिंग तपासणी करून गुन्ह्यांचा तपास करण्यात येणार आहे. पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी आधुनिक तंत्राचा वापर वाढवून तपास करण्याचे आदेश सर्व अधिकार्‍यांना दिले आहेत. लवकरच त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. 

अनिकेत कोथळे खून प्रकरणानंतर पोलिसांकडून कोठडीत होत असलेल्या मारहाणीबाबत अनेक प्रश्‍न उपस्थित केले जात आहेत. नुकतीच गुंड छोट्या बाबरनेही पोलिस कोठडीत मारहाण झाल्याची तक्रार न्यायालयात केली होती. त्यामुळे पोलिसही गुन्ह्यांचा तपास करताना सावधगिरी बाळगत होते; मात्र अधीक्षक  शर्मा यांनी कार्यभार घेतल्यानंतर तपासाची नवी पद्धत अवलंबण्याचे आदेश  सर्वच अधिकार्‍यांना दिले आहेत. त्यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा अधिक वापर करण्याच्याही सुचना त्यांनी दिल्या आहेत. 

त्यानुसार आता गंभीर गुन्ह्यातील संशयितांची लाय डिटेक्टर, ब्रेन मॅपिंग चाचणी करून तपास करण्यात येणार आहे. त्याशिवाय त्याचे कॉल डिटेल्स काढून त्याच्याशी संपर्कातील व्यक्ती, त्याचे लोकेशन याद्वारेही तपास करण्यात येणार आहे. संशयिताची चौकशी करताना त्याची पार्श्‍वभूमी, त्याच्यावर पूर्वी असलेले गुन्हे याचीही सर्व माहिती घेण्यास तपास अधिकार्‍यांना सांगण्यात आले आहे. त्यामुळे आता अधीक्षक शर्मा यांनी दिलेल्या आदेशानुसार यापुढे आधुनिक पद्धतीने गुन्ह्यांचा तपास करण्यात येणार आहे. 

लाय डिटेक्टर, ब्रेन मॅपिंगशिवाय नार्को चाचणीही करण्याची तयारी पोलिसांनी ठेवली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून गुन्ह्यांचा तपास केल्याने त्यात अचूकता तर येणारच आहे. त्याशिवाय गुन्ह्यातून कोणताही संशयित सुटू शकणार नाही असा विश्‍वास अधीक्षक शर्मा यांना आहे. तपासात तंत्रज्ञानाच्या वापराबाबत त्यांनी कार्यभार घेताच संकेत दिले होते. त्यानुसार आता गुन्ह्यांचा तपास केला जात आहे.