Thu, Jun 27, 2019 09:36होमपेज › Sangli › कृषी अनुदान घोटाळ्याची चौकशी करा

कृषी अनुदान घोटाळ्याची चौकशी करा

Published On: Mar 13 2018 1:43AM | Last Updated: Mar 13 2018 1:43AMसांगली : प्रतिनिधी

कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या मरळनाथपूर (ता. वाळवा) या गावात कृषी विभागाच्या अनुदानात लाखो रुपयांचा घोटाळा झाल्याची तक्रार करण्यात आली. त्यासंदर्भात चौकशीचे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी अधिकार्‍यांना सोमवारी दिले.

दिवंगत व्यक्‍तींच्या नावे कृषी साहित्य वाटप, वीज कनेक्शन नसलेल्या 28 जणांना कृषी पंप आणि जमीन नसताना कृषी योजनांच्या अनुदानाचा लाभ देऊन लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केल्याची तक्रार जिल्हाधिकारी विजयकुमार काळम- पाटील यांनी आयोजित केलेल्या  बैठकीत  करण्यात आली.

जिल्हाधिकारी कार्यालयात भ्रष्टाचार निर्मूलन समितीची बैठक झाली.  त्यावेळी बळीराजा संघटनेचे संस्थापक बी. जी. पाटील आणि संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष सुयोग औंधकर यांनी भ्रष्टाचाराची तक्रार केली. तसेच  सोबत आणलेली कागदपत्रे  भ्रष्टाचाराचे पुरावे म्हणून सादर केली.  करण्यात आलेल्या तक्रारी आणि सादर झालेली कागदपत्रे पाहिल्यानंतर  या सर्व प्रकरणाची   सखोल चौकशी करावी आणि दोषींवर कडक  कारवाई करावी,  असे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी जिल्हा कृषी अधीक्षक  राजेंद्र साबळे यांना दिले.  या संपूर्ण योजनेच्या   जिल्ह्यात झालेल्या अंमलबजावणीची चौकशी करणे गरजेचे असल्याचे पत्र कृषी आयुक्तांना पाठवण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकारी  पाटील यांनी  पत्रकारांना सांगितले.  

बी. जी. पाटील आणि औंधकर यांनी   मरळनाथपूर येथील घोटाळ्याविषयी पहिल्यांदा कृषी विभागकडे तक्रार केली होती. मात्र त्याची फारशी  दखल घेतली गेली नाही. त्यामुळे या प्रकरणाविषयी  पाटील आणि औंधकर यांनी भ्रष्टाचार निर्मूलन समितीकडे तक्रार दाखल केली. त्या समितीची आज बैठक झाली. त्यात त्या गावातील घोटाळ्याचे पुरावे सादर करण्यात आले.  जिल्हाधिकार्‍यांनी त्यांची तत्काळ दखल घेतली. मरळनाथपूर येथील 28 शेतकर्‍यांना कृषी पंपांचे वाटप करण्यात आले आहे. या  शेतकर्‍यांकडे वीज कनेक्शन आहे का, याचा दाखला जोडलेला नाही.  वीज कनेक्शन नसताना हे पंप दिले गेले आहेत अशी तक्रार करण्यात आली.   

रामचंद्र दादू खोत या दिवंगत व्यक्तीच्या नावे दहा हजार रुपयांचे अनुदान लाटण्यात आले आहे. ही व्यक्ती 30 ऑगस्ट 1990 ला दिवंगत  झाल्याचा दाखला सादर करण्यात आला. त्यांच्या नावे 2015-16 ला अनुदान देण्यात आले आहे. संदीप शामराव खोत यांच्या नावे जमीनच नाही, तरी त्यांना 1 लाख 33 हजार रुपयांचे कृषी अनुदान देण्यात आले आहे.  सुनील मारुती  खोत यांना  3 लाख 65 हजार रुपयांचे अनुदान देण्यात आल्याचे पुरावे सादर करण्यात आले. बाळाबाई बापू राऊत या महिलेने मला कोणतेही  शेती साहित्य किंवा अनुदान मिळाले नाही, असे शपथपत्र दिले आहे. त्यामुळे त्यांच्या नावे अनुदान इतरांनीच लाटण्यात आल्याची तक्रार करण्यात आली.
आजच्या बैठकीत आटपाडी येथील शेतकर्‍यांना  नियमबाह्य दिलेले कृषी अनुदान, क्रीडा विभागाने विना निविदा केलेली कामे  या संदर्भात जिल्हाधिकारी पाटील यांनी संबंधित अधिकार्‍यांना धारेवर धरले.