Thu, Jul 18, 2019 10:15होमपेज › Sangli › काँग्रेसमध्ये इच्छुकांच्या उद्यापासून मुलाखती

काँग्रेसमध्ये इच्छुकांच्या उद्यापासून मुलाखती

Published On: Jun 29 2018 12:01AM | Last Updated: Jun 28 2018 11:45PMसांगली : प्रतिनिधी

महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस इच्छुकांच्या शनिवारपासून (दि. 30) दोन दिवस मुलाखती घेण्यात येणार आहेत. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी मंत्री सतेज पाटील यांच्यासह आठजणांची कोअर कमिटी या मुलाखती घेणार असल्याचे शहर जिल्हाध्य पृथ्वीराज पाटील यांनी पत्रकार बैठकीत सांगितले. शनिवारी  सांगली व कुपवाडमधील इच्छुकांच्या मुलाखती येथील कच्छी भवन येथे होतील. मिरजेतील मुलाखती तेथील पटवर्धन हॉल येथे होणार आहेत. 

पाटील म्हणाले, महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाकडे इच्छुकांची संख्या भरपूर आहे. सर्व 20 प्रभागात पक्षाकडे मोठ्या संख्येने ंइच्छुक उमेदवार आहेत. 225 अर्जांची विक्री झाली आहे. त्यापैकी 180 जणांनी अर्ज दाखल केले आहेत. शुक्रवारपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. त्यामुळे आणखी किमान 100 जणाचे अर्ज दाखल होतील. ज्यांनी पक्षाकडे उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यांनाच मुलाखतीसाठी बोलावले जाणार आहे. ते म्हणाले, शनिवारी  सांगलीतील सर्व प्रभाग व कुपवाडमधील प्रभाग क्रमांक 1 व 8 मधील उमेदवारांच्या मुलाखती होतील.  रविवारी मिरजेतील सर्व व कुपवाडमधील प्रभाग क्रमांक 2 मधील इच्छुकांच्या मुलाखती होणार आहेत.

पाटील म्हणाले, प्रदेश काँग्रेसने मुलाखतींसाठी कोअर कमिटी नेमली आहे. तीत हर्षवर्धन पाटील, सतेज पाटील, अभय छाजेड यांच्यासह जिल्हाध्यक्ष आमदार मोहनराव कदम,  मी, आमदार विश्वजित कदम, माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील, काँग्रेस नेत्या जयश्री पाटील यांचा समावेश आहे. ही कमिटी इच्छुकांच्या मुलाखती घेणार आहे. त्यानुसार तुल्यबळ उमेदवारांची यादी केली जाईल. प्रदेश कार्यकारिणीच्या मान्यतेने त्यावर शिक्कामोर्तब होईल.ते म्हणाले, भाजपसारख्या जातीयवादी पक्षाला रोखण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीसाठी दोन्हीकडून प्रयत्न आहेत.  आम्ही सर्वच प्रभागात काँग्रेसतर्फे स्व:बळासाठी सक्षम उमेदवारांची यादी तयार ठेवू.  जनता दलही आघाडीत येण्यास तयार आहे.  प्रदेशाध्यक्ष प्रा. शरद पाटील यांच्याशी चर्चेनुसार तीन जागा सोडण्यात येणार आहेत.

41-27 पाया धरून उर्वरित जागांसाठी चर्चा

काँग्रेस - राष्ट्रवादी आघाडीबाबत पाटील म्हणाले, राष्ट्रवादीने काँग्रेसला 35 व त्यांना 43 जागांचा प्रस्ताव दिला होता.  तोअतिशयोक्‍तीचा  होता. काँग्रेसमधून काही नगरसेवक बाहेर पडले. त्यामुळे आमच्या जागा 31 झाल्या तर त्यांच्या वाढून 27 झाल्या आहेत. हा पाया धरून त्यांनी त्यांचा प्रस्ताव केला आहे. पण ते चुकीचे आहे. आमच्यातील काही लोक पक्ष सोडून गेले याचा अर्थ आमचा त्या जागेवरचा हक्क जात नाही. पक्षाच्या चिन्हावर तेथे निवडणूक झाल्याने या जागा काँग्रेसच्याच आहेत. त्यामुळे आमच्याकडे 41 तर त्यांच्याकडे अपक्षांच्या पाठिंब्यासह 27 जागा आहेत. ते संख्याबळ गृहित धरून त्यांनी चर्चा करावी. उर्वरित जागांसाठी चर्चा होऊ शकेल,  असा नवीन प्रस्ताव काँग्रेसने त्यांना दिला आहे. यावर आता त्यांच्याकडून उत्तर आल्यावर चर्चा होईल.