Sun, Aug 25, 2019 08:36होमपेज › Sangli › मनपात काँग्रेसमध्ये पुन्हा गटबाजी जोमात

मनपात काँग्रेसमध्ये पुन्हा गटबाजी जोमात

Published On: Apr 09 2018 1:31AM | Last Updated: Apr 08 2018 11:18PMसांगली : प्रतिनिधी

महापालिका निवडणुकीच्या  तोंडावर काँग्रेसमध्ये पुन्हा गटबाजी उफाळून आली आहे. यामध्ये स्थानिक नेत्यांमध्ये नेतृत्वासाठी रस्सीखेच सुरू आहेच. दुसरीकडे इच्छुकांतूनही संधीसाठी दावे सांगत हमरी-तुमरी सुरू झाली आहे. काही इच्छुकांनी तर वेगवेगळे गट पकडून संधीसाठी दावेदारी सुरू केली आहे. यातून उमेदवारी वाटपात कसा तोडगा निघणार, यातच काँग्रेसची महापालिका निवडणुकीत कसोटी लागणार आहे. महापालिकेत महाआघाडीचा अपवाद वगळता काँग्रेस नेते मदन पाटील यांच्या नेतृत्वाखाली एकहाती सत्ता होती. परंतु गेल्या महापालिका निवडणुकीत सत्तेसाठी स्व. मदन पाटील व ज्येष्ठ नेते डॉ. पतंगराव कदम यांनी ताकद पणाला लावली होती. त्याद्वारे बहुमताने काँग्रेसचा झेंडा फडकला होता. 

परंतु मदन पाटील यांच्या निधनानंतर गटबाजी जोमात उफाळून आली. यामध्ये मदनभाऊ गट विरुद्ध उपमहापौर गटाच्या माध्यमातून दुफळी निर्माण झाली होती. याला वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते विशाल पाटील यांनी बळ दिले होते. त्यानंतर ते या गटापासून दुरावले तरी नगरसेवक शेखर माने यांच्या नेतृत्वाखाली गट मजबूत होता. यामुळे काँग्रेस नेत्या जयश्री पाटील यांनी काँग्रेसचे नेतृत्व स्वीकारले होते. त्यांना डॉ. पतंगराव कदम, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डॉ. विश्‍वजित कदम यांनी पाठबळ दिले होते. त्याच आधारे गटबाजीला चाप लावण्यासाठी ते प्रयत्नशील होते.  परंतु आता डॉ. पतंगराव कदम यांच्या जाण्याने मोठी पोकळी निर्माण झाली आहे. 

सध्या महापालिकेची सूत्रे जयश्रीताई पाटील यांच्याकडे आहेत.  काँग्रेस एकसंघ करण्यासाठी शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील प्रयत्नशील आहेत.  डॉ. कदम यांच्या पश्‍चात काँग्रेसची सत्ता अबाधित ठेवण्यासाठी  जिल्हाध्यक्ष  आमदार मोहनराव कदम, जयश्री पाटील, डॉ. विश्‍वजित कदम, माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील, युवा नेते विशाल पाटील यांना एकसंध करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.  तरीही नेतृत्व कोणाचे यावरून पुन्हा छुपा संघर्ष सुरू झाला आहे. एकीकडे इच्छुकांची मोठी रस्सीखेच सुरू असतानाच नेत्यांनीही यातून आपल्या गटाची मोर्चेबांधणी सुरू केली आहे.  मदन पाटील गटाच्या विद्यमान नगरसेवकांतील काही नाराजांनी  विशाल पाटील यांच्याकडे संपर्क वाढविला आहे. त्या आधारे कारखाना परिसराचे कार्यक्षत्र वाढवून विधानसभेसाठी प्रबळ दावेदारीची वाट बळकट करण्याची त्यांनी तयारी केली आहे.  दुसरीकडे मदनभाऊ गटातही विद्यमान त्याच - त्या पदाधिकारी, नगरसेवकांविरोधात आता सक्षम दावेदार पुढे आले आहेत. खुद्द जयश्री पाटील यांच्या निवासस्थान असलेल्या बालेकिल्ला असलेल्या प्रभागातही यातून गटबाजी उफाळली आहे.  यामुळे पक्षांतर्गत गटबाजी आणि त्यातून नेत्यांचा संघर्ष याचा उमेदवारीत कसा मेळ होणार? उमेदवारीमध्ये बंडखोरी कशी थोपवली जाणार, यावर  काँग्रेसचे यश-अपयश अवलंबून राहणार आहे. 
 

Tags : Internal Conservancy,  Congress, Corporator Member, Sangli Corporation