Wed, Jul 17, 2019 18:12होमपेज › Sangli › मिरजेत इच्छुकांच्या पायाला भिंगरी

मिरजेत इच्छुकांच्या पायाला भिंगरी

Published On: Jul 05 2018 1:40AM | Last Updated: Jul 04 2018 8:28PMमिरज : जालिंदर हुलवान

महानगरपालिकेच्या निवडणुकीला आता रंगत येऊ लागली आहे.  मिरजेत इच्छुक उमेदवार अक्षरश: पायाला भिंगरी लावल्यासारखी मतदारांच्या भेटीगाठीसाठी फिरू लागले आहेत. निवडून येण्याची क्षमता असणार्‍यांना आपल्या पक्षात घेण्यासाठी भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीचे फोडाफोडीचे राजकारण जोरदारपणे सुरूच आहे. महापालिकेची निवडणूक जाहीर होऊन आता आचारसंहिता लागली आहे. त्यामुळे आता राजकीय पक्ष, इच्छुक उमेदवार चांगलेच कामाला लागले आहेत. या निवडणुकीत अनेक पक्ष उतरणार असले तरीही भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, एमआयएम या पक्षांमध्येच मिरजेत लढती होणार आहेत, असे आजचे तरी चित्र आहे. कशा लढती होतील आणि कोण कोण उमेदवार रिंगणात राहतील. हे दि. 16 व 17 जुलैरोजी माघारी नंतरच चित्र स्पष्ट होणार आहे. आज पासून (दि. 4) उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत. दि. 1 ऑगस्ट रोजी मतदान आहे. त्यामुळे राजकीय पक्षांनी आरोप- प्रत्यारोप करण्यास सुरुवात केली आहे. मिरजेत काँग्रेस व भाजपच्या इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. 

या मुलाखतीच्या दरम्यान काँग्रेसचे नेते व आमदार सतेज पाटील यांनी भाजपवर टीका केली.  त्यांना खासदार संजय पाटील व आमदार सुरेश खाडे यांनीही प्रत्त्युत्तर दिले आहे. एकीकडे काँग्रेस आणि भाजपने इच्छुकांच्या मुलाखती मिरजेत घेतल्या पण राष्ट्रवादीने मात्र मिरजेतील इच्छुकांच्या मुलाखती  सांगलीत घेतल्या. मुलाखतीदरम्यान, काँग्रेसच्या इच्छुकांनी  शक्‍तीप्रदर्शन केले. मात्र, भाजपच्या काही इच्छुकांनी तर अधिकच जोरदार शक्‍तीप्रदर्शन केले. इतरांनी साधेपणाने मुलाखती दिल्या आहेत.

आपला माणूस... कामाचा माणूस...

गेल्या दोन महिन्यांपासूनच अनेक इच्छुकांनी प्रचाराचा नारळ फोडला आहे. आतातर घरोघरी त्या इच्छुकांची माहिती पत्रके येऊ लागली आहेत. आपण कसे वेगळे आहोत हे दाखविण्याचा प्रयत्न ते करीत आहेत. अनेकांनी काही घोषवाक्ये वापरली आहेत. ‘आपला माणूस, कामाचा माणूस, हक्काचा माणूस, कार्यसम्राट माणूस, विकासाचा माणूस, सरळ माणूस’ असे त्यांनी स्वत:चेच नव्याने बारसे घातले आहे.

भाजपमधील धुसफूस उघड्यावर... 

भाजपने गेल्याच महिन्यात मिरजेतील काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसेतील काही आजी-माजी नगरसेवकांना आपल्याकडे ओढून घेतले आहे. भाजपची उमेदवारी ‘फिक्स’ असल्याचे गृहित धरून काहींनी प्रचार सुरू केला आहे. त्यामुळे आजही उमेदवारी मिळणार नसल्याचे चित्र दिसत असल्याने भाजपमधील निष्ठावंतांमध्ये नाराजीचा सूर आहे. त्याचा प्रत्यय भाजपच्या इच्छुकांच्या  मुलाखतीदरम्यान आला. भाजपच्या जिल्हा उपाध्यक्षाने  30 लाख रुपयांचा धनादेश  दाखवित मला उमेदवारी द्या, अशी मागणी केली. त्यामुळे पक्षातील धुसफूस बाहेर पडू लागली आहे.