Wed, Feb 20, 2019 07:27होमपेज › Sangli › शिधापत्रिकेवर परस्पर लाभार्थीचा शिक्का मारला

शिधापत्रिकेवर परस्पर लाभार्थीचा शिक्का मारला

Published On: Jul 01 2018 1:53AM | Last Updated: Jun 30 2018 11:58PMमिरज : प्रतिनिधी

शिधापत्रिका कार्डावर ‘प्राधान्य कुटुंब लाभार्थी’ असा बोगस शिक्का मारुन शासकीय कागदपत्रांत परस्पर फेरफार केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्यांक विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष हारुण खतीब यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश तहसीलदार शरद पाटील यांनी दिले आहेत. तसेच संबंधित शिधापत्रिका जमा करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. 

खॉजा वसाहत व कोल्हापूर चाळ या भागामध्ये शिधापत्रिकाधारकांना त्यांच्या पत्रिकेवर ‘प्राधान्य कुटुंब लाभार्थी’ असा निळ्या रंगाचा शिक्का मारुन शासकीय कागदपत्रात फेरफार करण्यात आल्याबाबत संबंधीतांची चौकशी करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे योगेंद्र थोरात यांनी  केली होती. चौकशी दरम्यान इब्राहीम साहेबलाल शेख यांच्या शिधापत्रिकेवर असा  शिक्का मारल्याचे आढळून आले. यावरुन शेख यांचा तहसीलदारांनी जबाब नोंदविला. त्यामध्ये हारुण खतीब यांचे नाव उघडकीस आले.

शेख यांनी जबाबात म्हटले आहे, की  धान्य मिळत नसल्याने ते मिळावे यासाठी  खतीब यांच्याकडे गेलो होतो. त्यांनी शिक्का मारुन देतो. त्यानंतर तत्काळ आपणास धान्य सुरू होईल असे सांगितले. शिधापत्रिकेवर ‘प्राधान्य कुटुंब लाभार्थी’ हा निळ्या रंगाचा शिक्का मारुन प्रतिकार्ड 100 रुपये घेतले.

खॉजा वसाहत व कोल्हापूर चाळ मध्ये असे प्रकार घडले असून संबंधीत रेशन दुकानदारांना सर्व शिधापत्रिका जप्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बनावट शिक्का मारण्यात आलेल्या शिधापत्रिकाधारकांना धान्य वितरित केले जाणार नाही,असे तहसीलदार  पाटील यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसमधील संघर्ष चव्हाट्यावर

या प्रकरणी योगेंद्र थोरात यांनी हारुण खतीब यांच्या विरुद्ध तहसीलदारांकड तक्रार केली होती. हे दोघेही प्रभाग क्र. 20 मधून राष्ट्रवादीतर्फे इच्छुक आहेत. या तक्रारीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधीलच अंतर्गत संघर्ष उफाळून आला आहे.