Wed, Mar 27, 2019 06:41होमपेज › Sangli › आंतरजातीय विवाह : लवकरच कायदा 

आंतरजातीय विवाह : लवकरच कायदा 

Published On: May 25 2018 1:11AM | Last Updated: May 24 2018 11:29PMसांगली : प्रतिनिधी

आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाहांना प्रोत्साहन, संरक्षण देण्यासंदर्भात नवीन कायदा तयार करण्यात येत आहे. तो कायदा प्रत्यक्ष वस्तुस्थिती आणि कायद्याची सांगड घालणारा असेल, अशी माहिती आंतरजातीय विवाह कायदा प्रारूप समितीचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती /जमाती आयोगाचे सदस्य सी. एल. थूल यांनी गुरुवारी येथे दिली. 

येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. विविध सूचना, तक्रारी,  खासदारांची  पत्रे यांचा  विचार करून   शासनाने  असा कायदा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी सात सदस्य समिती स्थापन करण्यात आली आहे.  त्याचे अध्यक्ष म्हणून थूल यांनी आज आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाह केलेल्या जोडप्यांशी संवाद साधला. 

यासंदर्भात काम करणार्‍या सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, कार्यकर्त्यांचे अनुभव, समस्या, सुचना जाणून घेतल्या. जिल्हाधिकारी विजयकुमार  काळम- पाटील, समाजकल्याणचे सहाय्यक आयुक्त सचिन कवले, जिल्हा परिषदेचे समाजकल्याण अधिकारी राधाकिसन देवढे,  सुरेश दुधगावकर आदि उपस्थित होते.

थूल म्हणाले, आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह हे प्रचलित चालीरीती सोडून, प्रवाहाच्या विरोधात जाणारे एक धाडसी पाऊल असते. ते  समाजपरिवर्तनाचे काम आहे. अशा जोडप्यांना हानी पोहोचविणार्‍यांना कठोर शिक्षा होईल. 

ते म्हणाले,  नवीन कायद्यामध्ये आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाहांना संरक्षण, पुनर्वसनाची तरतूद असेल. त्यांच्या भावी पिढीचे समायोजन याबाबत समिती ठोस भूमिका घेईल.  असे विवाह करू इच्छिणार्‍या जोडप्यांना नोंदणीसाठी स्वजिल्ह्याचे बंधन असणार नाही. राज्यातील कोणत्याही जिल्ह्यात विवाहनोंदणी करता येईल.  या जोडप्यांना सुरवातीच्या  कालावधीत निवारा उपलब्ध व्हावा असा प्रयत्न असेल. 

सुरेखा कांबळे,  स्वप्नील बनसोडे,  रघुनाथ पाटील, मयुरी नाईक, राहुल थोरात आदिंनी त्यांचे अनुभव, समस्या, सूचना थूल यांच्यासमोर मांडल्या. दरम्यान सकाळी  थूल यांनी जिल्हाधिकारी पाटील, पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत बगाडे यांची बैठक घेऊन जिल्ह्यातील सद्यस्थिती जाणून घेतली.  आरक्षण समस्या आणि अनुसूचित जाती /जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा यासंदर्भात वकिलांशीही चर्चा केली.