Tue, May 21, 2019 04:55होमपेज › Sangli › अपुरा पाणी पुरवठा; ड्रेनेज नाहीच

अपुरा पाणी पुरवठा; ड्रेनेज नाहीच

Published On: May 25 2018 1:11AM | Last Updated: May 24 2018 8:06PMसांगली : शिवाजी कांबळे

सांगली आणि कुपवाडच्या हद्दीवर असलेल्या प्रभाग एक मध्ये विशेषत: शालिनीनगर, अहिल्यानगर भागात अपुरा पाणी पुरवठा आणि डे्रनेजची समस्या कायमच राहिली आहे. अन्य नागरी सुविधांची देखील या भागातील नागरिकांना प्रतीक्षा आहे.

कुपवाड  ग्रामपंचायत ते महानगरपालिका व्हाया  नगरपालिका असा या  प्रभागाचा प्रवास राहिला आहे. सुरुवातीपासून सर्वच घटक नागरी सुविधा देण्यासाठी असमर्थ ठरले. समस्या त्याच, पण   लोकप्रतिनिधी बदलत राहिले.  सन 1926 मध्ये कुपवाड ग्रामपंचायतीची स्थापना झाली. पुढे 1999 मध्ये नगरपालिका तर सन 2000 मध्ये कुपवाडचा  महापालिकेत समावेश करण्यात आला. अर्थात स्थानिक स्वराज्य संस्थांचे नाव बदलत गेले, भागातील समस्या मात्र कायमच राहिल्या. या प्रभागातील अहिल्यानगरमध्ये पुरेशा गटारी नाहीत. विजयनगरमध्ये रस्त्यांची दुर्दशा नेहमीचीच आहे.  सांडपाण्यासाठी गटारी नाहीत. प्रकाशनगर गुंठेवारीत असल्याने रस्ते अरूंद आहेत, गटारी नाहीत. शालिनीनगर येथे अपुरा पाणी पुरवठा होत आहे. रामकृष्णनगर येथे रस्ते, गटारींसह अपुर्‍या पाणीपुरवठ्याचे चित्र कायमचेच आहे.

संपूर्ण प्रभागात नियोजनबद्ध व चांगल्या दर्जांच्या गटारी बनविणे अवश्यक आहे. प्रभागातील मोठा भाग हा गुंठेवारी क्षेत्रात येते. जमीन मालकांनी प्लॉट पाडतानाच जेमतेम 10-15 फूट रुंदीचे रस्ते सोडले आहेत. आता या अरूंद रस्त्यांमुळे  नागरिकांना ये - जा करण्यास त्रास होत आहे. गुंठेवारी क्षेत्रातून जमा झालेल्या निधीपैकी 60 टक्के निधी हा त्याच परिसरात खर्च करण्याचे बंधन आहे. मात्र हा नियम येथे लोकप्रतिनिधींना दिसलाच नाही. कधीतरी डास प्रतिबंधक औषध फवारले जाते. ते  निकृष्ट असते. अनेक प्लॉटधारकांनी नियमितीकरण शुल्क भरले आहे. परंतु अद्याप प्रमाणपत्र मिळालेले नाही. आंबा चौक व कापसे प्लॉट  या ठिकाणी पोलिस मदत केंद्र गरजेचे  आहे. आंबा चौक येथे पोलिस मदत केंद्र मंजूर आहे. यासाठी पोलिसांकडून पालिकेकडे  परवानगीसाठी पत्र व्यवहार केले, मात्र मंजुरी मिळत नाहीच!