Tue, Jun 18, 2019 21:03होमपेज › Sangli › खानापूर तालुक्यात अपुर्‍या कर्मचार्‍यांमुळे रुग्णसेवा सलाईनवर

खानापूर तालुक्यात अपुर्‍या कर्मचार्‍यांमुळे रुग्णसेवा सलाईनवर

Published On: May 09 2018 1:56AM | Last Updated: May 08 2018 7:43PMविटा  :  प्रवीण धुमाळ 

खानापूर तालुक्यात अपुर्‍या कर्मचार्‍यांमुळे आरोग्य यंत्रणा कोलमडली आहे. पंचायत समिती सभापतींच्या गावातीलच पद रिक्त आहे. याचा आरोग्य सेवेवर परिणाम होत आहे.  त्यामुळे रुग्णांना खासगी दवाखान्याची वाट धरावी लागत आहे. तालुक्यातील तीन आयुर्वेदिक दवाखान्यात डॉक्टर उपलब्ध नसल्याने कुुलूप बंद आहेत.

तालुक्यात दोन ग्रामीण रुग्णालये आणि चार प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. विटा आणि करंजे येथे ग्रामीण रुग्णालय आहे. तर खानापूर, विटा, वेजेगाव आणि लेंगरे येथे प्राथमिक आरोग्य केंद्र तर 24 उपकेंद्र आहेत. नव्याने 6 उपकेंद्रे मंजूर झाली आहेत. विटा, खानापूर आणि वेजेगाव या तिन्ही आरोग्य केंद्रात आरोग्य सहाय्यिका पद रिक्त आहे. लेंगरे येथे नव्याने प्राथमिक  आरोग्य केंद्राला मंजुरी मिळाली आहे.  लेंगरेत सुसज्ज सर्वसोयीनियुक्त अशी इमारतही बांधून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत  आहे. पंचायत समितीच्या सभापती मनीषा बागल यांचे गाव असलेल्या लेंगरे गावात आरोग्य सेविकेचे पद रिक्त असल्याने त्याचा अतिरिक्त चार्ज दुसर्‍या सेविकेकडे देण्यात आला आहे. 

गार्डी, कार्वे, वासुंबे, मंगरुळ या चार गावांमध्ये आरोग्य सेवकांची पदे रिक्त आहेत. तर खानापूर, विटा आणि वेजेगाव या तीनही प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये डॉक्टरांची पदे रिक्त आहेत. पारे, लेंगरे, माहुली या तीन ठिकाणी आयुर्वेदिक दवाखाने मंजूर आहेत. परंतु या तिन्ही ठिकाणी डॉक्टर नसल्याने ही तिन्ही केंद्रे बंद अवस्थेत आहेत.

विटा आणि करंजे येथे ग्रामीण रुग्णालये  आहेत. करंजे ग्रामीण रुग्णालय हे गावापासून थोड्या अंतरावर  असल्यामुळे या ठिकाणी रुग्णांची वर्दळ कमी असते. या ठिकाणी  स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टरची नेमणूक व्हावी, अशी मागणी परिसरातील रुग्णांतून होत आहे.

तसेच हे ठिकाणी तालुक्यापासून दूर असल्याने या ठिकाणी डॉक्टर मुक्कामाला नसतात. एक डॉक्टर तासगावहून तर दुसरे इस्लामपूरहून येत असल्याने रुग्णांना डॉक्टरची वाट पहात ताटकळत  बसावे लागते. या ठिकाणी वाहनांची सोय नसल्याने रुग्णांना वाट पाहण्याशिवाय दुसरा पर्यायच नसतो. डॉक्टरांना राहण्याची सक्ती करावी, अशी मागणी होत आहे.

डॉक्टरांची खासगी प्रॅक्टीस जोमात...

विटा-गुहागर राज्यमार्ग असल्याने या ठिकाणी  नेहमी छोटे- मोठे अपघात होत असतात. परंतु निवासी तसेच वेळेत डॉक्टर येत नसल्याने  त्याचा रुग्णसेवेवर परिणाम होत आहे. या ठिकाणी निवासी डॉक्टर द्यावेत, अशी मागणी रुग्णांतून होत आहे. विटा येथील ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर हे क्वॉटर्समध्ये रहात नाहीत. तसेच यातील काही डॉक्टरांनी विटा शहरात खुलेआम वैद्यकीय व्यवसाय करीत आहेत. या डॉक्टरांनी एकतर स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय करावा किंवा पूर्णवेळ ग्रामीण रुग्णालयात सेवा द्यावी, यासाठी शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी उपोषण केले होतेे. या आंदोलनाची प्रशासनाने दखल घेवून ग्रामीण रुग्णालयातील रुग्ण खासगी दवाखान्यात पळविणार्‍या डॉक्टरवर कारवाई करण्यात आली. शहरात स्वतःचे हॉस्पिटल चालविणार्‍या डॉक्टरची बदली करण्यात  आली होती. परंतु आता पुन्हा काही डॉक्टरांनी स्वतःची ओपीडी शहरात सुरू केली आहे.