होमपेज › Sangli › सांगलीकरांनो, चूक पोटात घ्या, सुधारायची संधी द्या

सांगलीकरांनो, चूक पोटात घ्या, सुधारायची संधी द्या

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सांगली : प्रतिनिधी

पोलिसांवर कामाचा ताण आहे. माणूस म्हणून चूक होते. त्या चुका तुम्ही पोटात घ्या. आम्हाला सुधारण्याची संधी द्या, असे भावनिक आवाहन  कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनी केले. ते सोमवारी नागरिकांच्या बैठकीत बोलत होते. यावेळी नूतन पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनीही यापुढे पोलिसांकडून चांगली सेवा मिळेल, अशी ग्वाही दिली. 

अनिकेत कोथळे या तरुणाचा कोठडीत असताना पोलिसांनी केलेल्या मारहाणीमुळे मृत्यू झाला. या प्रकारामुळे पोलिसांच्याविषयी नागरिकांमध्ये नाराजीची भावना आहे. पोलिसांच्या अनुषंगाने असणार्‍या अन्य तक्रारी व नागरिकांच्या समस्येबाबत सांगली व मिरज शहरातील शांतता समिती सदस्य, नागरिक यांची आज  नांगरे-पाटील यांनी बैठक घेतली. माजी आमदार हाफीज धत्तुरे, अरुण दांडेकर, प्रिया महाजन, डॉ. नथानिअल ससे, डॉ. विकास पाटील, डॉ. प्रशांत लोखंडे, माधव गाडगीळ, ज्ञानचंद्र पाटील यांच्यासह अनेकांनी प्रश्‍न मांडले. 

महिला व मुलींची छेडछाड करणार्‍यांचा बंदोबस्त करावा. प्रत्येक पोलिस ठाण्यात सूचना पेटी ठेवा. मिरजेत वाहतूक पोलिस कर्नाटकातील वाहनधारकांना त्रास देतात तो बंद करा. व्हिडीओ गेम्स बंद करावेत. पूर्वीप्रमाणे पोलिसांचा वचक निर्माण करावा. गतिरोधक बसवावेत. सी.सी.टीव्ही. कॅमेरे बसवावेत, अशा अनेक मागण्या नागरिकांनी केल्या. तसेच सूचना केल्या. 

नांगरे-पाटील म्हणाले, पोलिस हे जनतेच्या सेवेसाठी आहेत. जनतेने शासनाला दिलेल्या करातून आम्हाला पगार मिळतो. माणूस म्हणून चूक होते, त्या चुका तुम्ही पोटात घ्या. आम्हाला सुधारण्याची संधी द्या. अप्पर अधीक्षक शशिकांत बोराटे, उपअधीक्षक डॉ. दीपाली काळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत उपस्थित होते.