Sat, Jul 20, 2019 13:50होमपेज › Sangli › बेदाणा कोल्डस्टोअरेजची तपासणी

बेदाणा कोल्डस्टोअरेजची तपासणी

Published On: Aug 26 2018 1:29AM | Last Updated: Aug 25 2018 11:38PMसांगली : प्रतिनिधी

कोल्हापूर जीएसटी आयुक्‍त कार्यालयाकडील  करचुकवेगिरीविरोधी भरारी पथकाने सांगली, तासगावमधील 25 बेदाणा कोल्डस्टोअरेजची तपासणी केली आहे. सेवाकराच्या अनुषंगाने कागदपत्रांची छाननी सुरू आहे. ‘जीएसटी’च्या मिरज कार्यालयाने गूळ, बेदाण्याच्या 1 हजार 136 अडत्यांकडून कमिशन उलाढालीबाबत व बेदाण्याच्या 100 कोल्डस्टोअरेज मालकांकडून भाडे रक्‍कम उलाढालीची माहिती मागविली आहे. अडत कमिशन व भाड्याच्या रकमेवर सेवाकर न भरल्यास वसुलीच्या नोटिसा निघणार आहेत. 

सेवाकर कायद्यानुसार गूळ, बेदाणा शेतीमाल व्याख्येत येत नाही सेवाकर कायद्यानुसार बेदाणा व गूळ शेतीमाल व्याख्येत येत नाही. शेतीमालाव्यतिरिक्‍त वस्तूंना सन 2012 ते दि. 30 जून 2017 या कालावधीत सेवाकर लागू होता. बेदाणा व गुळाच्या खरेदी-विक्री व्यवहारावरील अडत कमिशनवर आणि कोल्डस्टोअरेजमधील बेदाणा भाडेरकमेवर सेवाकर आकारला नव्हता. 

केंद्रीय ‘जीएसटी’च्या मिरज कार्यालयाने मागील पाच वर्षांतील (सन 2013 ते 30 जून 2017) अडत कमिशन व भाडे रकमेच्या व्यवहारांची माहिती 1 हजार 136 अडते व बेदाण्याचे 100 कोल्डस्टोअरेज मालकांकडून मागविली आहे. ही माहिती तत्काळ सादर करण्याच्या सूचना त्यांना पत्राद्वारे देण्यात आल्या आहेत. 

सेवाकर व्याजासह न भरल्यास आयुक्‍त कार्यालयाकडून नोटिसा

सन 2012 च्या दरम्यान 12.36 टक्के सेवाकर होता. जून 2017 पर्यंत सेवाकराची रक्‍कम 15 टक्क्यांपर्यंत वाढत गेली. सन 2013 ते दि. 30 जून 2017 या कालावधीतील बेदाणा, गुळावरील अडत कमिशन आणि या कालावधीतील कोल्डस्टोअरेजमधील बेदाण्यावरील भाड्याच्या रकमेवर त्या-त्या कालावधीतील सेवा करानुसार आकारणी केली जाणार आहे. सेवाकर व्याजासह न भरल्यास जीएसटीच्या कोल्हापूर आयुक्‍त कार्यालयाकडून संबंधितांना नोटिसा निघणार आहेत. ‘जीएसटी’च्या कोल्हापूर आयुक्‍त कार्यालयाकडील  करचुकवेगिरीविरोधी पथकाने सांगली व तासगाव परिसरातील 25 कोल्डस्टोअरेजची तपासणी केली आहे. बेदाण्याच्या भाडेरकमेची माहिती घेतली आहे. कोल्डस्टोअरेजमधील कागदपत्रांची छाननी सुरू आहे, अशी माहितीही सुत्रांनी दिली.