Thu, Jul 18, 2019 10:09होमपेज › Sangli › बनावट नोटाप्रकरणी चौकशी सुरू

बनावट नोटाप्रकरणी चौकशी सुरू

Published On: Jul 08 2018 1:45AM | Last Updated: Jul 08 2018 1:45AMसांगली : वार्ताहर

महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर एका पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये बनावट नोटा खपविण्याच्या उद्देशाने आलेल्या दोन संशयितांना ‘अर्थपूर्ण’ चौकशी करून मुद्देमालासह पोलिसांनी सोडून दिल्याची शंका आहे. पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांना चौकशीचे आदेश दिले आहेत. या वृत्ताला श्री. पिंगळे यांनीही दुजोरा दिला आहे. 

औद्योगिक हद्दीत असलेल्या जिल्ह्यातील एका पोलिस ठाण्याच्या हद्दीत नुकतीच घडलेली ही घटना.  एका बारमध्ये दोन परप्रांतीय दारू पिण्यासाठी त्यादिवशी दुपारी आले होते. त्यांच्यासोबत असलेली बॅग त्यांनी टेबलवर ठेवली. त्या बॅगेमध्ये नोटा होत्या. या नोटा बनावट असल्याच्या व त्या  खपविण्याच्या उद्देशाने ते परप्रांतीय सांगलीत आल्याचे त्यांच्या बोलण्यावरुन व हालचालीवरुन बारमधील वेटरच्या लक्षात आले.

त्या वेटरने हॉटेल मालकाला ही गोष्ट निदर्शनास आणून दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून संबंधीत हॉटेल मालकांनी एका पोलिसाला फोन केला. बनावट नोटा व त्या व्यक्तींबद्दल माहिती दिली. संबंधीत पोलिस ठाण्यातील दोन कॉन्स्टेबल हॉटेलमध्ये आले. प्राथमिक चौकशीत त्या दोघांना संशय आल्याने त्यांनी त्या परप्रांतीयांना पोलिस ठाण्यात चौकशीसाठी नेले.  दुपारची वेळ असल्याने पोलिस ठाण्यात पोलिसांची संख्या कमी होती.  त्या दोन पोलीसांनी परप्रांतीयांना पोलिसी खाक्या दाखविताच  बनावट नोटा खपविण्यासाठी सांगलीत आल्याचे कबूल केले. तसेच या गुन्ह्यामध्ये सामील असणार्‍यांची माहिती दिली. 

दरम्यानच्या काळात ही घटना संबंधीत परप्रांतीयांच्या गॉडफादरला कळाली. त्याने जोरदार फिल्डींग लावून दोन पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी देखील  सखोल चौकशी करुन आरोपात तथ्य नसल्याचे समजून हे प्रकरण फाईल बंद केले व त्या दोघांना सोडून दिले. या प्रकरणाची जिल्हा पोलीस अधिक्षक सुहेल शर्मा यांनी दखल घेतली व पोलीस निरीक्षक पिंगळे यांना चौकशीचे आदेश दिले. श्री. पिंगळे यांनी त्या पोलिसांचे जबाब नोंदविले असून. सीसीटीव्ही फुटेज मिळविले आहेत. तसेच त्या दोन संशयित परप्रांतीयांचे पत्ते मिळवून त्यांना ताब्यात घेऊन सखोल चौकशी करण्याची शक्यता आहे.