Thu, Aug 22, 2019 10:52होमपेज › Sangli › इस्लामपुरात घरात घुसून बाप-लेकांना मारहाण

इस्लामपुरात घरात घुसून बाप-लेकांना मारहाण

Published On: May 22 2018 1:15AM | Last Updated: May 21 2018 11:44PMइस्लामपूर : शहर वार्ताहर

शिवीगाळ  केल्याचा जाब विचारला म्हणून घरात घुसून मारहाण केल्याप्रकरणी सहाजणांवर इस्लामपूर पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे. हा मारहाणीचा प्रकार रविवारी रात्री घडला होता. या मारहाणीत रविकिरण वसंतराव सुपुगडे (वय 30) व वसंतराव बाळकू सुपुगडे (वय 65, दोघे रा. मंत्री कॉलनी, इस्लामपूर) हे पिता-पुत्र जखमी झाले आहेत. मुजम्मील शेख, इरग्या, मंज्या, जयद्या (सर्व रा. हनुमाननगर, इस्लामपूर), सूरज बाबर, तायाप्पा शिर्के (दोघे रा. मंत्री कॉलनी, इस्लामपूर) अशी संशयितांची नावे आहेत.  

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी ः रविकिरण सुपुगडे हे मंत्री कॉलनी परिसरात राहतात. रविवारी रात्री 10 च्या सुमारास रविकिरण जीप (एम.एच. 10/सीए-1789) ने कराडहून इस्लामपुरात आले होते. घरानजिक त्यांची जीप आली असता मुजम्मील हा मोटारसायकलवरून समोरून आला. गाडीच्या दिव्यावरून मुजम्मीलने रविकिरण यांना शिवीगाळ केली. त्यावेळी रविकिरण यांनी शिवीगाळीचा जाब विचारला. मुजम्मीलने ‘पाच मिनिटात तुला दाखवितो’, अशी धमकी दिली. 

रात्री 10.15 वाजण्याच्या सुमारास मुजम्मील शेख व त्याचे साथीदार सूरज, तायाप्पा, इरग्या, मंज्या, जयद्या हे तलवारी घेऊन आले. रविकिरण घरात जात असताना मुजम्मीलने काठीने त्यांच्या डोक्यात, उजव्या हातावर मारहाण केली. नंतर तायाप्पाच्या हातातील तलवार घेऊन रविकिरण यांच्यावर उगारली. त्यांनी भीतीने घरात धाव घेतली. त्यावेळी वडील वसंतराव मध्ये आले. त्यामुळे  तलवारीने त्यांच्या पोटाला जखम झाली. घरातील लोकांनी आरडाओरडा केल्याने संशयितांनी पळ काढला. 

सुपुगडे कुटुंब दहशतीखाली...

मुजम्मील व त्याचे साथीदार  यांनी तलवारी घेऊन रविकिरण यांच्या घरात घुसून मारहाण करून दहशत निर्माण केली. घरातून बाहेर पडताना या टोळीने घरातील साहित्य विस्कटून टाकले. घराच्या बाहेर  असलेल्या गाडीचे कुशन तलवारीने फाडून नुकसान केले. या प्रकारानंतर सुपुगडे कुटुंब दहशतीखाली होते.