Mon, Apr 22, 2019 15:52होमपेज › Sangli › जिल्ह्यात आजपासून बेमुदत धरणे

जिल्ह्यात आजपासून बेमुदत धरणे

Published On: Aug 07 2018 1:01AM | Last Updated: Aug 07 2018 1:01AMसांगली : प्रतिनिधी

संपूर्ण महाराष्ट्रात लाखोंचे 58 मूक मोर्चे काढूनही शासनाने मराठा आरक्षणाबाबत ठोस निर्णय घेतलेला नाही. निर्णय घेण्यास विलंब होत असल्याने राज्यात सर्वत्र आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन पेटले आहे. सांगली जिल्ह्यातही मंगळवारपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात येणार आहे. अहिंसात्मक पद्धतीने आंदोलन करूनही शासनाने त्वरित निर्णय न घेतल्यास आंदोलनाची तीव्रता वाढवण्याचा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विलास देसाई, डॉ. संजय पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिला. 

ते म्हणाले, मंगळवारी सकाळपासून सांगलीतील स्टेशन चौकातील (स्व.) वसंतदादा पाटील यांच्या पुतळ्याजवळ बेमुदत धरणे आंदोलन सुरू होईल. त्याशिवाय, जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत तहसीलदार कार्यालयाजवळही बेमुदत धरणे धरण्यात येणार आहे. भारतात 24 लाख नोकर्‍या उपलब्ध असल्याचे शासनानेच जाहीर केले आहे. देशात 3 कोटी बेरोजगार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दरवर्षी एक कोटी रोजगार देण्याचे आश्‍वासन दिले होते. मात्र, आजपर्यंत एकालाही नोकरी मिळालेली नाही. 

मराठा समाजाला आरक्षणाचे आश्‍वासन देऊनही सरकारने ते न पाळल्याने समाज आता रस्त्यावर उतरला आहे. मराठा समाजाच्या असंतोषाला राज्य सरकारच जबाबदार आहे.  युवकांचा संयम संपत असल्याने आंदोलने हिंसक होत आहेत. त्यामुळे आरक्षणाबाबत तातडीने निर्णय घेण्याची आवश्यकता आहे, असेही देसाई, डॉ. पाटील  म्हणाले. 

अ‍ॅड. अमित शिंदे म्हणाले, राज्य शासनाची अण्णासाहेब पाटील महामंडळाची घोषणाही फसवी आहे. महामंडळाकडून कर्ज वाटपाच्या नावाखाली शासनाने केवळ गाजर दाखवले आहे. त्याचा फायदा मराठा समाजाला झाला नाही. शैक्षणिक फीमध्ये पन्नास टक्के सवलत  जिल्ह्यातील महाविद्यालयांनी प्रत्यक्षात विद्यार्थ्यांना  दिली नाही. शासनाने फी सवलतीचा अध्यादेश काढला नसल्याचे कारण महाविद्यालयांकडून पुढे केले जात आहे. 2017 पासून विद्यार्थ्यांना फीमध्ये 50 टक्के सवलत देऊन ते पैसे विद्यार्थ्यांच्या खात्यावर भरल्यास थोडा असंतोष कमी होईल असेही ते म्हणाले. अमोल सूर्यवंशी, अशोक पाटील, राजेंद्र पाटील, प्रवीण पाटील, चंद्रकांत डिगे, नानासाहेब कदम, संकेत परब, राहुल पाटील, नाना हलवाई उपस्थित होते. 

अहिंसात्मक आंदोलन करा

दरम्यान समाजबांधवांनी अहिंसात्मक पद्धतीने आंदोलन करावे. एस.टी. बसची तोडफोड करू नये. शासकीय कार्यालये, मालमत्ता यांचीही तोडफोड करू नये. शांततापूर्ण पद्धतीने आंदोलन करावे, असे आवाहनही समन्वयकांकडून करण्यात आले.

अन्य समाजांपासून तोडण्याचा डाव

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेशी संवाद साधताना मराठा आरक्षणाचा प्रश्‍न निकाली काढत नाही तोपर्यंत 72 हजार जागांची मेगाभरती स्थगित करण्याची घोषणा केली. मराठा क्रांती मोर्चाने कधीही ही मेगाभरती स्थगित करण्याची मागणी केली नव्हती. त्याशिवाय या मेगाभरतीबाबत आतापर्यंत एकही जाहिरात देण्यात आलेली नाही. शिवाय कोणत्या विभागात ही भरती करणार आहे तेही जाहीर केले नाही. मुख्यमंत्र्यांची भरती स्थगितीची घोषणा म्हणजे अन्य समाजांपासून मराठा समाजाला तोडण्याचा डाव असल्याचा आरोपही यावेळी देसाई, डॉ. पाटील यांनी केला.