Thu, May 23, 2019 04:19होमपेज › Sangli › भाजप सत्तेत आल्यापासून महागाई

भाजप सत्तेत आल्यापासून महागाई

Published On: May 24 2018 1:22AM | Last Updated: May 23 2018 10:05PMकुपवाड : वार्ताहर 

काँग्रेस- राष्ट्रवादी सरकारच्या काळात महागाईची झळ जनतेला बसत नव्हती. आमचे सरकार त्वरित पावले उचलून महागाई आटोक्यात आणत होते. मात्र भाजपचे सरकार सत्तेवर आल्यापासून महागाईने कळस गाठला आहे. महागाईच्या भडक्यात जनता होरपळून निघत आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केली. 

राष्ट्रवादीतर्फे येथे आयोजित  कार्यकर्ता संवाद मेळाव्यात  ते बोलत होते. शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, विधानसभा क्षेत्राध्यक्ष कमलाकर पाटील, श्रीनिवास पाटील, विरोधी पक्षनेते शेडजी मोहिते, राष्ट्रवादीचे नेते जमीर रंगरेज, मुस्ताकअली रंगरेज,नगरसेवक विष्णू माने, पद्माकर जगदाळे,जुबेर चौधरी, रमेश आरवाडे प्रमुख उपस्थित होते.  आमदार पाटील म्हणाले,  महापालिकेच्या निवडणुकीत भाजप  मतदारांना भेट वस्तू व नोटांचे दर्शन दाखविण्याच्या तयारीत आहे. ते मतदारांना विकत घेण्याचे स्वप्न पाहत आहेत.  निवडणुकीत 60 जागा जिंकण्याच्या पोकळ वल्गना करीत आहेत. मात्र त्यांचा राष्ट्रवादी व कॉग्रेस आघाडीपुढे ठिकाव लागणार नाही. ते म्हणाले, सन 2008 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीने जो जाहीरनामा दिला होता. तो  घेऊन विकासाच्या मुद्यावर आम्ही मोठ्या ताकदीने महापालिकेच्या निवडणुकीत उतरणार आहोत.जनतेने राष्ट्रवादीला साथ द्यावी. 

ते म्हणाले,  महाआघाडी सत्तेत असताना नागरिकांचा पाणीपुरवठ्याचा प्रश्‍न प्राधान्यक्रमाने सोडविला होता. त्यावेळी सत्तर एमएलडी क्षमतेच्या पाणीपुरवठा प्रकल्पाचे काम 80 टक्के पूर्ण केले होते. उर्वरित 20 टक्के  काम पूर्ण करून सध्याचे सत्ताधारी त्याचे लवकरच उदघाटन करणार आहेत. रस्ते, ड्रेनेज योजना, उद्याने अशी विकासकामे महाआघाडीच्या काळात मार्गी लावली आहेत. त्यामुळे जनता आमच्या पाठीशी आहे.  माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळातील  सभ्य भाजप  आता मोदी आणि शहा यांच्यासारख्या माणसांचा पक्ष झालेला आहे अशी खोचक टीकाही आमदार पाटील यांनी यावेळी केली.