Mon, Jun 17, 2019 14:43होमपेज › Sangli › अर्भक विक्रीचे रॅकेट सांगली जिल्ह्यातही?

अर्भक विक्रीचे रॅकेट सांगली जिल्ह्यातही?

Published On: Feb 09 2018 2:02AM | Last Updated: Feb 08 2018 11:05PMसांगली : गणेश कांबळे

इचलकरंजी येथे अर्भक विक्रीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उघडकीस आले आहे. आता याची पाळेमुळे सांगली जिल्ह्यातही दिसून येत आहेत. ग्रामीण भागातील एजंटापासून ते डॉक्टरापर्यंतची साखळी असून, यातून  लाखो रुपयांची कमाई केली जात असल्याचा संशय आहे. त्यामुळे त्या दृष्टीने चौकशी करण्याची गरज आहे.

इचलकरंजी येथे डॉ. अरुण पाटील यांच्या रुग्णालयात अर्भक विक्रीचे प्रकार होत असल्याचे उघड झाले आहे. केंद्रीय पथकाकडे तक्रार आल्यानंतर त्यांनी दखल घेऊन इचलकरंजीत छापा टाकला. त्यानंतर हे रॅकेट उघडकीस आले. अर्भक विक्रीचे रॅकेट सांगली जिल्ह्यातही आहे. विशेषत: सीमाभागात अर्भकांची विक्री केली असल्याची चर्चा आहे. 

ग्रामीण भागात एजंटाचा सुळसुळाट

मूल होण्यासाठी डॉक्टरांकडे उपचार सुरू असतात. परंतु काही कारणांमुळे जोडप्यांना मूल होऊ शकत नाही. त्यामुळे यासाठीचा दुसरा पर्याय म्हणजे दत्तक कायद्यानुसार प्रयत्न करणे. परंतु मूल दत्तक घेण्याची प्रक्रिया क्‍लिष्ट आहे. त्यामुळे तातडीने मूल कुठे मिळेल का यासाठी अनेक जोडपी प्रयत्न करीत असतात. काही एजंट  अशा जोडप्यांना हेरून मूल मिळवून देतात. त्यासाठी हे एजंट डॉक्टरांच्या संपर्कात असतात. यातून लाखो रुपयांची कमाई होते. 

कायद्यातून पळवाटा काढण्याचा प्रकार

दत्तक प्रक्रिया केल्याशिवाय कोणत्याही जोडप्याला मूल देता येत नाही. त्यासाठी अनेक कडक नियम केले आहेत. दत्तक प्रक्रियेमध्ये दोन दोन वर्षे मुलासाठी वाट पहावी लागते. त्यामुळे या प्रक्रियेमध्ये न अडकता कायदेशीर मार्गाने मूल कसे मिळेल, यासाठी काही एजंट आणि डॉक्टर मंडळी प्रयत्न करीत असतात. 

जन्मदाते पालक म्हणून जोडप्यांची नोंद

प्रेमात फसलेल्या, बलात्कार झालेल्या अनेक अल्पवयीन मुली गर्भवती राहिलेल्या असतात. त्यांचा गर्भपात करण्यासाठी या मुलींना घेऊन त्यांचे पालक डॉक्टरांकडे जात असतात. वास्तविक पाहता तीन महिन्यांपर्यंतच मुलीचा गर्भपात करता येतो. परंतु अनेक मुली गर्भपातासाठी तीन महिन्यानंतर डॉक्टरकडे जातात. त्यानंतरही त्यांचा अर्भपात करण्याची प्रक्रिया ही डॉक्टरमंडळी करीत असतात. त्यापेक्षाही अधिके महिने झाले असतील तर मात्र  मूल जन्माला घालण्याशिवाय पर्याय नसतो.  

वास्तविक  ही प्रक्रिया कायदेशीर करावी लागते. मुलगी अल्पवयीन असली तर तिची नोंद पोलिस ठाण्यात करावी लागते. परंतु काही डॉक्टरमंडळी ही नोंद न करता आपल्या हॉस्पिटलमध्ये तिला दाखल करून तिचे बाळतंपण करतात. मुलाचा जन्म झाल्यानंतर ते तिच्याकडून  काढून घेऊन तिला  मोकळे केले जाते. 

त्यानंतर ज्या जोडप्यांना मूल हवे आहे, त्यांना ते दिले जाते. परंतु ते देत असताना पालक म्हणून नोंद मात्र जोडप्यांची  केली जाते. त्यामुळे आई वडील म्हणून जोडप्यांचे नाव लागत असल्याने बेकायदेशीर असा कोणताही प्रकार त्या ठिकाणी आढळत नाही. परंतु यात मात्र लाखो रुपयांचा व्यवहार मात्र होत असतो. 

अधिकार्‍यांना कल्पना असूनही दुर्लक्ष

बेकायदेशीररित्या  अर्भकांची विक्री होत असल्याची माहिती यावर नियंत्रण ठेवणार्‍या अधिकार्‍यांना कल्पना असते. परंतु त्याकडे दुर्लक्ष केले जाते. शासकीय अधिकार्‍यांनी, जिल्हा प्रशासनांनी वेळोवेळी ‘स्टिंग ऑपरेशन’ केले तर हा प्रकार उघडकीस येऊ शकतो. परंतु त्याकडे दुर्लक्ष केले जाते.