Thu, Apr 25, 2019 18:49होमपेज › Sangli › अपक्षांनी मिळवली १६.३० टक्के मते

अपक्षांनी मिळवली १६.३० टक्के मते

Published On: Aug 04 2018 1:36AM | Last Updated: Aug 03 2018 10:39PMसांगली : प्रतिनिधी

सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका  निवडणुकीत सर्वाधिक 41 जागा पटकावलेल्या भाजपला 35.14 टक्के मते मिळाली आहेत. काँग्रेसला 20.70 टक्के, राष्ट्रवादीला 15.60 टक्के मते मिळाली आहेत. अपक्षांनी तब्बल 16.30 टक्के मते घेत निवडणूक निकालावर परिणाम घडवून आणला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीतील बंडखोरीमुळे आघाडीला काही जागा गमवाव्या लागल्या आहेत. काँग्रेस बंडखोर गजानन मगदूम हे एकमेव अपक्ष उमेदवार निवडून आले आहेत. मात्र अनेक अपक्षांनी घेतलेली मते लक्षणीय आहेत. 

महापालिका निवडणुकीसाठी 4 लाख 24 हजार 179 मतदार होते. त्यापैकी 2 लाख 63 हजार 732 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.  18 प्रभागात प्रत्येकी 4 उमेदवार, तर 2 प्रभागात प्रत्येकी 3 असे एकूण 20 प्रभागात 78 उमेदवार निवडून द्यायचे होते. अठरा प्रभागात एका मतदाराला 4, तर दोन प्रभागात एका मतदाराला 3 मते द्यायची होती. मतदान केलेल्या 2 लाख 63 हजार 732 मतदारांची 10 लाख 33 हजार 395 मते वैध ठरली. 

वैध 10 लाख 33 हजार 395 मतांपैकी भाजपला 3 लाख 63 हजार 93 मते पडली आहेत. मतांचे हे प्रमाण 35.14 टक्के आहे. काँग्रेसला 2 लाख 13 हजार 877 मते मिळाली आहेत. हे प्रमाण 20.70 टक्के आहे. राष्ट्रवादीला  1 लाख 61 हजार 28 मते (15.60 टक्के) मिळाली आहेत. अपक्षांना 1 लाख 68 हजार 461 मते (16.30 टक्के) मिळाली आहेत. 

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी झाल्यानंतर दोन्ही पक्षातील उमेदवारी न मिळालेल्या प्रभावी इच्छुकांना आपल्या छावणीत ओढण्याच्या प्रयत्नात भाजप होता. मात्र उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत काँग्रेस-राष्ट्रवादीने आघाडीचे उमेदवार गुलदस्त्यात ठेवले. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादीतील नाराज भाजपच्या हाती लागले नाहीत. मात्र उमेदवारी न मिळालेल्या नाराजांनी अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरून आघाडीच्या उमेदवारांची  दमछाक केली. बहूसंख्य अपक्ष हे काँग्रेस, राष्ट्रवादीचे आहेत. 

निवडणूक जिंकण्यात अपक्षांना विशेष यश आले नाही. काँग्रेस बंडखोर उमेदवार गजानन मगदूम हे एकमेव अपक्ष विजयी झाले आहेत. मात्र अन्य काही अपक्षांनी चांगली मते घेतली आहेत. एकूण अपक्षांची मते 1 लाख 68 हजार 461 आहेत. त्यांच्या मतांचा टक्का 16.30  इतका लक्षणीय आहे. अपक्षांच्या मतांचा निवडणूक निकालावर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.