होमपेज › Sangli › दरवाढीमुळे एस. टी. झाली ‘लक्झरी’

दरवाढीमुळे एस. टी. झाली ‘लक्झरी’

Published On: Jun 18 2018 1:11AM | Last Updated: Jun 17 2018 7:58PMसांगली : गणेश कांबळे

डिझेल दरवाढ, कामगार वेतनाचा मुद्दा पुढे करून एस.टी. महामंडळाने 18 टक्के दरवाढ केली. रेल्वे, खासगी प्रवासी वाहतुकीच्या तुलनेत ही सर्वाधिक दरवाढ आहे.  लक्झरी गाड्यांच्या बरोबरीने एस. टी. चे दर गेल्याने एस.टी. आता गरिबांची राहिली नाही. दरवाढीमुळे प्रवाशांचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे आता प्रवासी संख्येत घट होण्याची भीती आहे. तर आधीच तोट्यात असलेल्या एस.टी. ला पुन्हा तोट्याच्या गर्तेत ढकलण्याची  योजना सरकारनेच आखली असल्याची टीका केली जात आहे.

‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ या  ब्रीदवाक्यानुसार  एस.टी. धावू लागली. एस.टी. मुळे अनेक गावे  जोडली गेली, त्यांच्या विकासाला गती लाभली. मात्र कालांतराने खासगी वाहतुकीने एस.टी. ला आव्हान निर्माण केले. एस.टी. च्या केवळ सांगली विभागाला दरवर्षी 40 ते 50 कोटींचा तोटा सहन करावा लागतो. आता डिझेल दरवाढ, कामगार वेतनवाढीमुळे एस.टी. ने 16 जूनपासून 18 टक्के दरवाढ केली आहे. याचा फटका प्रवाशांना बसणार आहे. साहजिकच  प्रवाशांचा ओढा  खासगी वाहतूक व रेल्वे प्रवासाकडे वळत आहे. 

याबाबत एस.टी. वर्कर्स युनियन (इंटक) चे नेते रावसाहेब माणकापुरे म्हणाले, कर्नाटक, गुजरात, तेलंगणा, आंध्रप्रदेशच्या तुलनेत महाराष्ट्रातील दर भरमसाठ आहे. अन्य राज्यात टप्प्याला 80 पैसे किलोमीटर पडतो, तर तोच दर महाराष्ट्रात 1.21 पैसे आहे.  एस. टी. ची किती दरवाढ करावी, यासाठी समिती नेमली होती. या समितीने कमीतकमी 10 टक्के दरवाढीची शिफारस केली होती. परंतु सरकारने  सरसकट 18 टक्के दरवाढ करून प्रवाशांना झटका दिला आहे. साहजिकच भविष्यात धोकादायक  खासगी प्रवासाकडे प्रवासी वळणार आहेत. यातून 10 ते 15 टक्के फटका ही एस.टी. सोसावा लागेल. 1999 मध्ये बसेसची संख्याही 18000 होती. लोकसंख्येचा विचार करता ती 25000 इतकी होणे गरजेचे होते. मात्र  ती संख्या 17500 एवढीच आहे.   

रेल्वेपेक्षा एस.टी. चे दर पाचपट

गेल्या चार वर्षात डिझेलचे दर ज्यावेळी वाढतील त्यावेळी एस. टी. दरवाढ होत आली आहे. 2014 मध्ये जुलै व ऑगस्ट या  महिन्यांत दोनवेळ दरवाढ झाली.  तुुलनेत रेल्वेची दरवाढ मात्र झालेली नाही. अतिशय कमी दरात रेल्वेचा सुरक्षित प्रवास सुरू आहे. सांगली - मुंबई किंवा सांगली - पुणे असा प्रवास घेतला तर रेल्वेपेक्षा पाच पट जास्त भाडे जास्त आहे. प्रवासी आता रेल्वेने जाणे पसंत करीत आहेत. 
खासगी ट्रॅव्हल्सचे मनमानी दरएस.टी. चे दर कितीही वाढो, खासगी ट्रॅव्हल्सचे दर मात्र मनमानी असतात. सांगलीतील काही ट्रॅव्हल्सचे  सांगली - मुंबईचे दर 500 रुपयांपासून 1300 रुपयांपर्यंत आहेत. जास्त दरामध्ये एसी, स्लिपर सुविधा असते.

शहर वाहतूक बसेस 108 वरून 60 वर

सांगली व मिरज दरम्यान शहरी  वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू होती. 1981 मध्ये या मार्गावर 108 बसेस धावत होत्या. उत्पन्नही चांगले होते. मात्र नंतर वडाप व खासगी रिक्षांमुळे एस.टी.ला तोटा होऊ लागला. सध्या या मार्गावर केवळ 60 बसेस धावत आहेत. पूर्वी या शहरातून तीन मिनिटाला एक बस सुटत होती. ती आता तासाला एक सुटते.  गेल्या 20 वर्षात लोकसंख्या वाढलेली आहे. सुमारे 3 टक्के प्रवासी एस.टी. कडे वाढायला हवे होते. त्यानुसार बसेसची संख्याही वाढायला हवी होती. परंतु त्या संख्येमध्यही घट झाल्याचे रावसाहेब माणकापुरे यांनी सांगितले.

प्रवासी संघटना नावापुरत्या

डिझेल दरवाढ व कर्मचारी वेतनवाढीमुळे  एस.टी.ची भाडे  वाढ केल्याचे सरकार सांगते. या वाढीची वसुली तिकीट दरवाढीतून प्रवाशांच्या खिशातून केली जात आहे. रेल्वेपेक्षा पाचपट दरवाढ एस.टी. ने केली आहे. प्रवाशांनच्या  अडचणी, त्यांच्या हक्कासाठी लढण्याकरिता प्रवासी संघटना आहे. परंतु ही संघटना नावालाच असल्याची तक्रार प्रवाशांकडून करण्यात आली.भरमसाठ भाडेवाढ होताना  संघटना काय करते, असा सवला उपस्थित होतो आहे.