Mon, Jun 24, 2019 21:09होमपेज › Sangli › कृष्णाकाठी मगरींची वाढती दहशत

कृष्णाकाठी मगरींची वाढती दहशत

Published On: Jul 23 2018 1:11AM | Last Updated: Jul 22 2018 11:05PMसांगली : गणेश कांबळे

भिलवडी, ब्रह्मनाळ, तुंग, कसबे डिग्रज, सांगली या कृष्णानदी काठावरील गावांत वारंवार मगरींचे दर्शन घडत आहे. गेल्या 35 वर्षांत नदीकाठावरील परिसरात मगरींच्या हल्ल्यामुळे सुमारे 9 जणांना  प्राण गमवावे लागले आहेत. तर 20 जणांना कायमचे अपंगत्व आलेले आहे. मगरींचा कायमस्वरुपी बंदोबस्त करण्याची मागणी केली जात आहे. त्याचवेळी दुसरीकडे मगरींच्या पिलांची तस्करी होत असल्याचे प्रकारही समोर येत आहेत. मगरींच्या अधिवासातच मानवाने हस्तक्षेप केल्यामुळेही  त्या मानवी वस्तीच्या आसपास वावरू लागल्या आहेत.

पावसाळा सुरू झाला की कृष्णाकाठावर मगरींचे दर्शन सुरू होते. कधी हरिपूरच्या परिसरात तर कधी भिलवडी, तर तुंगच्या परिसरात मगरींचे दर्शन होत आहे. पाऊस सुरू झाला नदीच्या पाण्याची पातळी वाढते. त्यामुळे नदीमध्ये मूळ अधिवासात राहणार्‍या मगरी पाण्याच्या प्रवाहाबरोबर बाहेर पडतात.  त्यानंतर शरीराचे तापमान व्यवस्थित ठेवण्यासाठी त्या पाण्याच्या बाहेर येऊन बसतात.  तिकडे  कोणाचे लक्ष गेले की मगरी पाहिल्याचे सांगण्यात येते. 

मासेमारी करणार्‍यांना सर्वाधिक फटका.

भिलवडी, तुंग, माळवाडी, ब्रह्मनाळ या परिसरात मासेमारी करणारे  मोठ्या संख्येने आहेत. ते उदरनिर्वाह करण्यासाठी दररोज नदीवर जाऊन मासेमारी करतात. ता त्यांचा व्यवसाय आहे. तसेच नदीला पाणी वाढल्यानंतर मासेमारीसाठी गेलेल्या हौशी तरुणांवरही  मगरीने हल्ले केल्याच्या अनेक घटना घडलेल्या आहेत. गेल्या 35 वर्षांचा आढावा घेतल्यास 1984 पासून आतापर्यंत सुमारे 20 जणांचा मृत्यू झालेला आहे. त्यामध्ये तीन जण मासेमारी करणारे ठार झाले आणि तब्बल 13 जण गंभीररित्या जखमी होऊन अपंग झाले आहेत.  बैल, म्हशी धुणारे  व कपडे धुणार्‍या महिलांवर मगरीने हल्ला करून त्यांना ठार केलेले आहे. महिला नदीत कपडे धूत असताना तिच्या लहान मुलावर हल्ला करून त्याला ठार केल्याची घटनाही झाली आहे. याच वर्षी ब्रह्मनाळ येथे अंघोळीसाठी गेलेल्या 14 वर्षांच्या मुलाला ओढून नेऊन ठार केल्याची घटना झाली होती. एक  ऊसतोड कामगार हातपाय धुण्यासाठी नदीवर गेला असता मगरीने हल्ला करून त्याला ठार केले होते. 

मगरींच्या अधिवासात मानवाचा हस्तक्षेप

कृष्णाकाठावर पूर्वी मगरींचे क्‍वचित दर्शन व्हायचे. परंतु 2003 पासूनचा विचार केल्यास मगरीचे हल्ले वाढल्याच्या घटना समोर येत आहेत. याचे कारण म्हणजे नदीकाठावर वाळूचा उपसा मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यामुळे मगरींच्या अधिवासाची जी ठिकाणे आहेत, ती उद‍्धवस्त झाली आहेत. त्यामुळे  मगरींना राहायला जागाच नसल्याने त्या  भटकत आहेत.  स्वत:चा जीव वाचविण्यासाठी ते लोकांवर हल्ले करीत आहेत, अशी  माहिती प्राणीमित्र पापा पाटील यांनी  दिली. 

मगर भक्ष्य टिपण्यासाठी बाहेर येत नाही

पापा पाटील म्हणाले, पुरामुळे मगरींचे स्थलांतर होते. त्यांना अधून मधून किनार्‍यावर यावे लागते. शरीराचे तापमान योग्य राखणे आणि  हवा घेण्यासाठी त्यांना पाण्याबाहेर राहणे गरजेचे असते. त्यामुळे त्या नदीकाठावर कुठेतरी पडून असतात. त्यामुळे त्या  भक्ष्य टिपण्यासाठीच बाहेर येतात, असा समज करून घेऊन लोक त्यांच्यावर हल्ला करतात. लोकांनी  कोणताही हल्ला न करता  वनविभागाच्या अधिकार्‍यांना माहिती देणे योग्य ठरेल. 

शासनाकडून मदत

मासेमारी करताना ठार झालेल्या व जखमी झालेल्या लोकांना मदत मिळावी म्हणून तानाजी भोई यांनी प्रयत्न सुरू केले होते. गेल्या तीन वर्षांपासून मदत मिळायला सुरुवात झाली आहे. मगरीच्या हल्ल्यात ठार झालेल्यांना पूर्वी दोन लाख रुपये मदत मिळत होती. आता तिघांच्या कुटुंबीयांना आठ लाखांची मदत मिळाली आहे.  गंभीर जखमींना 50 हजार आणि किरकोळ जखमींना सात हजार रुपये मदत मिळाली आहे. परंतु मगरीचा बंदोबस्त करण्याचे कोणतेही प्रयत्न झाले नसल्याचे तानाजी भोई यांनी सांगितले. 

मगरीच्या हल्ल्यात 9 जणांचा मृत्यू ; 20 जण जखमी

1985 पासून आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू झाला आहे. ते असे : शंकर कृष्णा शेवाळे (भिलवडी), अनिकेत निकम  (वय 9, कसबे डिग्रज), रामचंद भिकू नलवडे (माळवाडी), सुनील पांडुरंग भोसले (वय 18),  वर्षा विलास कांबळे (वय 30, कासेगाव), वसंत बुरा मोरे (वय 46, रा. फारखांडे, जळगाव, ऊस तोड कामगार), अजय शहाजी यादव (वय 13, चोपडेवाडी), संजय भानुसे (तुंग), सागर डंक (वय 14, ब्रह्मनाळ). गंभीर जखमी असे : विठ्ठल यशवंत नलवडे, प्रल्हाद केशव कांबळे (भोई,भिलवडी), बाळकृष्णा रामचंद्र कांबळे (माळवाडी), दगडू मसू तावरे (माळवाडी), सुभाष नथुराम आपटे (भिलवडी), असरफ जहाँगीर पठाण (रामानंदनगर), करीम कासीम शेख (रामानंदनगर), तानाजी भोई (अंकलखोप), रामचंद्र नाना कांबळे (साखरवाडी), बाबासाहेब अमृत देसाई (सुखवाडी), अशोक सोनाप्पा नलवडे (भोई, भिलवडी), महादेव तुकाराम मोरे (तुंग), नाथा भीमसेन मोरे (तुंग), ईश्‍वरा भीमसेन बागडी. 

मगरींच्या पिलांची तस्करी?

सुरुवातीला मगरींची संख्या कमी होती. परंतु त्यांची संख्या आता शंभरच्या घरात गेलेली आहे. दरवर्षी मगरींची उत्पती होत आहे. परंतु मुंबईसारख्या ठिकाणी शौक म्हणून काहीजण बेकायदेशीरपणे मगरींची पिले पाळत असल्याच्या घटना समोर येत आहेत. त्यांच्यासाठी  येथून  मगरींची पिले पळवून त्यांची तस्करी करण्याचा उद्योग काहीजण करीत असल्याचा आरोप पापा पाटील यांनी केला. त्यामुळे पळविलेले पिलू शोधण्यासाठी म्हणून मगर बाहेर पडत असण्याची शक्यता आहे. त्यामुळे वनविभागाने अशा तस्करांचाही बंदोबस्त करण्याची गरज आहे.