Fri, Feb 22, 2019 12:30होमपेज › Sangli › मुलीचा जन्मदर वाढविणार्‍या गावांना बक्षिस

मुलीचा जन्मदर वाढविणार्‍या गावांना बक्षिस

Published On: Apr 07 2018 2:04AM | Last Updated: Apr 06 2018 11:53PMसांगली : प्रतिनिधी

मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी प्रयत्न करणार्‍या प्रत्येक तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींना बक्षिस दिले जाणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समिती सभापती प्रा. डॉ. सुषमा नायकवडी यांनी दिली.  

जिल्हा परिषदेत शनिवारी महिला व बालकल्याण समिती सभा झाली. अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. सुषमा नायकवडी होत्या. समिती सदस्य तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बाल कल्याण) शिल्पा पाटील, एकात्मिक बाल विकास प्रकल्पांचे बाल विकास प्रकल्प अधिकारी उपस्थित होते. 

जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागाने बेटी बचाव उपक्रम सुरू केला आहे. मुलींचा जन्मदर वाढावा यासाठी गेल्या तीन वर्षात ग्रामपंचायतींनी केलेले प्रयत्न व त्यामुळे मुलींचा वाढलेला जन्मदर यावरून प्रत्येक तालुक्यातून तीन ग्रामपंचायती निवडल्या जाणार आहेत. या ग्रामपंचायतींना बक्षिस दिले जाणार आहे, अशी माहिती प्रा. डॉ. नायकवडी यांनी दिली. 

महिला बचत गटांमार्फत अंगणवाडीतील बालकांना पूरक पोषण आहार दिला जातो. सप्टेंबर 2017 पर्यंतच्या पूरक पोषण आहाराची बिले शासनाकडून मिळालेली आहेत. मात्र ऑक्टोबर ते मार्च या सहा महिन्यांतील बिले अद्याप मिळालेली नाहीत. शासनाने ती तातडीने द्यावीत, अशी मागणी सभेत करण्यात आली.