Wed, Nov 14, 2018 23:05होमपेज › Sangli › तीव्र कुपोषित 200 बालकांचे वजन वाढले

तीव्र कुपोषित 200 बालकांचे वजन वाढले

Published On: Aug 25 2018 1:17AM | Last Updated: Aug 24 2018 7:33PMसांगली : प्रतिनिधी

जिल्ह्यातील तीव्र कुपोषित 294 पैकी 200 बालकांचे वजन वाढले आहे. आहार व आरोग्य उपचारानंतरही दरम्यान 94 बालकांचे वजन वाढले नाही. त्यांना आहार व औषधोपचार सुरू आहे. जिल्हा 100 टक्के कुपोषणमुक्त करण्याचा निर्धार केला आहे, अशी माहिती महिला व बालकल्याण सभापती डॉ. सुषमा नायकवडी यांनी दिली. जिल्हा परिषदेत गुरूवारी महिला व बालकल्याण समिती सभा झाली. अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. सुषमा नायकवडी होत्या. समिती सदस्या तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिल्पा पाटील, बालविकास प्रकल्प अधिकारी उपस्थित होते. 

ग्रामबालविकास केंद्रांच्या माध्यमातून तीव्र कुपोषित बालकांना सकस आहार व औषधोपचार सुरू आहेत. शून्य ते सहा वर्षे वयोगटातील बालकांची तपासणी करून दि. 1 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर या कालावधीतही ग्राम बालविकास केंद्राचा लाभ दिला जाणार आहे, असे डॉ. नायकवडी यांनी सांगितले. माझी कन्या भाग्यश्री योजनेचा जिल्ह्यातील 80 हून अधिक कुटुंबांनी लाभ घेतला आहे. काही लाभार्थींना बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखांकडून सहकार्य मिळत नसल्याची तक्रारही पुढे आली.