Tue, Apr 23, 2019 09:38होमपेज › Sangli › आयकरदात्यांच्या संख्येत 33 हजारांची वाढ

आयकरदात्यांच्या संख्येत 33 हजारांची वाढ

Published On: Mar 13 2018 11:04PM | Last Updated: Mar 13 2018 9:20PMसांगली : शशिकांत शिंदे

देशात गेल्या आर्थिक वर्षात लागू केलेली नोटाबंदी आणि त्यानंतर लागू केलेली जीएसटी यामुळे जिल्ह्यात आयकर भरणारांची संख्या वाढत असून ती 1 लाख 20 हजारापर्यंत गेली आहे. तीन वर्षात 33 हजाराने ही संख्या वाढली असून यंदा त्यात वाढ होईल, असा अंदाज आहे. दोन वर्षांपूर्वी आयकरातून पावणे दोनशे कोटी रुपये उत्पन्न गोळा झाले. यंदा ते चारशे कोटीपर्यंत जाईल, असा आयकर विभागाचा अंदाज आहे. 

दरम्यान, बँकांत मोठ्या प्रमाणात रकमा भरूनही आयकर न भरलेल्या 1 हजार 136 लोकांना गेल्या वर्षभरात नोटिसा काढण्यात आल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेवर आल्यानंतर नोटाबंदी आणि जीएसटी हे दोन धडाकेबाज निर्णय घेतले. नोटाबंदीनंतर पैसे भरण्यासाठी बँकासमोर रांगा लागल्या. या निर्णयाविरोधात आणि बाजूने अशा दोन्ही पध्दतीने प्रतिक्रिया उमटल्या. नोटाबंदीचा फायदा कितपत झाला आणि अच्छे दिन आले का, हा मुद्दा वादादित असला तरी जिल्ह्यात आयकर भरणार्‍यांच्या संख्येत वाढ  होत असल्याचे दिसत आहे.  जिल्ह्यात 2014-15 मध्ये सुमारे 87 हजार लोकांनी आयकर भरला होता. त्यानंतर गेल्या वर्षी मार्च अखेर आयकर भरणार्‍यांची संख्या 1 लाख 20 हजार झाली. यंदा आतापर्यंत 1 लाख 6 हजार लोकांनी आयकर भरला आहे. मार्च अखेरपर्यंत गेल्या वर्षीपेक्षा जास्त ग्राहक आयकर भरतील, असा अंदाज आयकर विभागाचे आयुक्त शिवानंद कलकेरी यांनी व्यक्त केला आहे.


जिल्ह्यात आयकर भरणारांची संख्या वाढल्याने विभागाच्या उत्पन्नातही वाढ झाली आहे. या विभागाला 15-16 मध्ये 174 कोटी उत्पन्न मिळाले होते. गेल्या वर्षी ते 287 कोटी गोळा झाले. त्यात 45 टक्केची वाढ गृहित धरून ते यंदासाठी मार्चअखेरपर्यंत 402 कोटी रुपयांचे टार्गेट देण्यात आले आहे. आतापर्यंत 228 कोटी रुपये वसूल झाले असून मार्चअखेरपर्यंत 402 कोटी वसूल होतील, असा अंदाज आहे. 

नोटाबंदीनंतर मोठ्या प्रमाणात लोकांनी पैसे बँकांत भरले. यातील 1 हजार 136 लोकांनी मोठ्या रकमा बँकांत भरल्या मात्र आयकर भरला नाही. त्यामुळे या विभागाने त्यांना नोटिसा काढल्या. त्यानंतर यातील बहुतेकांनी आयकर भरला मात्र अद्यापही काही लोक आयकर भरण्याचे बाकी आहेत. त्यांनी प्रत्येकी तीस ते चाळीस लाख रुपये बँकेत भरलेले आहेत. या लोकांनी मार्च अखेरपर्यंत आयकर भरला नाही तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे, असे कलकेरी यांनी सांगितले. मार्चपर्यंत त्यांनी रक्कम भरल्यास 35 टक्के; मात्र मार्चनंतर 70 टक्केपर्यंत दंडात्मक रक्कम भरावी लागणार आहे. त्यामुळे लोकांनी शेवटच्या काही दिवसात गर्दी करण्यापेक्षा वेळेवर आयकर भरावा, असे आवाहन आयकर विभागाने केले आहे.