Fri, Jul 19, 2019 19:51होमपेज › Sangli › कृष्णा, वारणा नद्यांच्या पातळीत वाढ

कृष्णा, वारणा नद्यांच्या पातळीत वाढ

Published On: Jul 18 2018 1:54AM | Last Updated: Jul 17 2018 11:46PMसांगली : प्रतिनिधी

कृष्णा खोरे पाणलोट क्षेत्रात तुफानी पाऊस सुरू आहे. धरणांत पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे कोयना धरणातून दरवाजे दोन फूट उचलून पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. चांदोलीतूनही विसर्ग सुरूच आहे.  जिल्ह्यातही जोरदार पाऊस पडत आहे. कृष्णा, वारणा नद्यांची पाणी पातळी वेगाने वाढते आहे. अनेक बंधारे, पूल, रस्ते पाण्याखाली गेले आहेत. बुधवारी या दोन्ही नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडण्याची शक्यता आहे. यामुळे नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. 

सोमवारी सायंकाळी ते मंगळवारी सकाळी आठ वाजेपर्यंत (गेल्या 24 तासांत) कोयना 237, नवजा 263 आणि महाबळेश्‍वर येथे 272 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.  धरणात प्रतिसेंकद 78 ते 80 हजार क्युसेक पाण्याची आवक होत आहे. धरण 78 टीएमसी (74 टक्के) भरले आहे. आज दिवसभर पावसाचा जोर  होता. कोयना येथे मंगळवारी सकाळी आठ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत 60, नवजा 95 आणि महाबळेश्‍वरला 62 मिलीमीटर पाऊस झाला. यामुळे धरणातून सकाळी पाण्याचा प्रतिसेंकद 2100 क्युसेक विसर्ग सुरु होता. तो सायंकाळी चार वाजता वाढविण्यात आला. धरणाचे दरवाजे दोन फुटांनी उचलून 7888 क्युसेक पाणी नदीत सोडले जात आहे. 

धोम परिसरात आज सकाळपर्यंत 38 व दिवसभरात 5 मिलीमीटर पाऊस पडला. हे धरण 7.84 टीएमसी (57 टक्के) भरले आहे. कण्हेर धरण भागात सकाळपर्यंत 64 व सायंकाळी पाच वाजेपर्यंत 16 मिमी पाऊस पडला. हे धरण 7.18 टीएमसी (70 टक्के) भरले आहे. चांदोली पाणलोट क्षेत्रात आज सकाळपर्यंत 97 व दिवभरात 47 मिलीमीटर पाऊस पडला. हे धरण 30 टीएमसी (86 टक्के) भरले आहे. या धरणातून सकाळी 13 हजार 885 असणारा विसर्ग सायंकाळी 18 हजार 110 क्युसेक करण्यात आला. 

जिल्ह्यात अनेक ठिकाणी  संततधार सुरू आहे. सांगली 31, मिरज 38, शिराळा 30, वाळवा  18, पलूस  19, कडेगाव 26, तासगाव  14, कवठेमहांकाळ 5, खानापूर-विटा येथे 16 व जत तालुक्यात 7 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.  ओढे, नाले दुथडी भरून वाहत आहेत. धरणातील विसर्ग व जिल्ह्यातील पावसामुळे कृष्णा, वारणा नद्यांचे पाणी वेगाने वाढत आहे. बहे पुलाजवळ सायंकाळी सहा वाजता 12 फूट पाणी पातळी होती. ताकारी 30 फूट, भिलवडी 29, सांगली 25 आणि अंकलीत 31 फुटांपर्यंत पाणी पोहोचले  होत. 

अनेक बंधारे, पूल, रस्ते पाण्याखाली गेले आहेत. काही ठिकाणी वाहतूक ठप्प झाली आहे. कृष्णेवरील बहे बंधारा पाण्याखाली गेला आहे. पलूस तालुक्यातील औंदुबर येथील दत्त मंदिरात पाणी घुसले आहे. वारणेवरील ऐतवडे खुर्द येथील पूल बुडाला आहे. धरणातून विसर्ग वाढल्याने बुधवारपर्यंत पाणी आणखी चार ते पाच फूट वाढण्याची शक्यता आहे.