Fri, Apr 26, 2019 18:10होमपेज › Sangli › मुंबई टिकण्यासाठी मराठी टक्‍का वाढवा

मुंबई टिकण्यासाठी मराठी टक्‍का वाढवा

Published On: Jan 15 2018 1:44AM | Last Updated: Jan 15 2018 12:07AM

बुकमार्क करा
सांगली : प्रतिनिधी

मतांचे राजकारण करीत महाराष्ट्राचे तुकडे करण्याचे षङ्यंत्र सुरू आहे. मुंबईही महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचा डाव सुरू असून, ती टिकण्यासाठी मुंबईत मराठी टक्‍का वाढवा, असे आवाहन राज ठाकरे यांनी सांगलीत सर्वपक्षीय कृती समितीच्या बैठकीत केले. 

पश्‍चिम महाराष्ट्राने यासाठी पुढाकार घ्यावा. यासंदर्भात मुंबईत महाराष्ट्रातील मराठी सहकारी, शैक्षणिक, व्यापारी संकुलांची लवकरच बैठक घेणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.  या संस्थांनी मुंबईत येऊन संस्थांच्या शाखा काढाव्यात, जाळे विणावे. त्यामध्ये मराठी माणसांना नोकर्‍या, उद्योग द्यावा. त्यासाठी मनसे पूर्ण ताकद पाठीशी उभी करेल, असे ते म्हणाले. 

श्री. ठाकरे यांनी अप्रत्यक्ष भाजपवरच निशाणा साधला. ते म्हणाले, मी जात-पात, धर्माच्या आणि राजकारण, निवडणुकांच्याही पलिकडे विचार करतो. वास्तविक मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे, याचा आपल्याला गर्व आहे. मुंबईने सर्वांना सामावून घेतले. पण मुंबईतून रिझर्व्ह बँकेच्या मुख्यालयासह विविध कार्यालये स्थलांतराचा उद्योग झाला. आताही स्वतंत्र विदर्भासह अनेक मागण्या सुरू आहेत. महाराष्ट्राचे तुकडे पाडून महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न आहे. मुंबई तर महाराष्ट्रापासून तोडण्याच्याही हालचाली सुरू आहेत. त्यामुळे मुंबई आणि महाराष्ट्र अखंड टिकायचा असेल, तर राजकारणाच्याही पलिकडे जावून सर्वच पक्षांनी एकत्र आले पाहिजे. अन्यथा मुंबईसह महाराष्ट्र तुकड्या-तुकड्यात कधीच विभागला जाईल. 

सांमिकु महापालिका निवडणुकीबाबत कृती समितीने विचारता ते म्हणाले, याबाबत नेते बाळा नांदगावकर यांना विचारा. मी त्याबाबत लक्ष घालणार नाही. यावेळी मनसेचे नेते नितीन सरदेसाई, अनिल शिदोरे,  कृती समितीचे काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, स्वाभिमानीचे सतीश साखळकर, जनसुराज्यशक्‍ती पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष समित कदम, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महेश खराडे,  मनसे शहराध्यक्ष अमर पडळकर, आवामी पार्टीचे अश्रफ वांकर, ट्रान्स्पोर्ट असोसिएशनचे महेश पाटील, माकपचे उमेश देशमुख, युवानेते शिवाजी मोहिते, प्रशांत भोसले आदी उपस्थित होते.

सद्भावना रॅली म्हणजे स्टंट

सांगलीत एकता रॅलीबद्दल कृती समितीने विचारता ते म्हणाले, कसली काय सद्भावना अन् एकता. अशा रॅलीच्या स्टंटने एकता होते का? गटारीत अत्तराची बाटली टाकून शुद्धिकरण होत नाही. त्यासाठी ज्यांनी या दंगली घडविल्या त्याच्या मुळाशी गेले पाहिजे. माणसांचे मुडदे पाडणारे राजकारण काय कामाचे? त्यांच्या गरजा जाणून त्यांच्यात एकोपा घडविण्यासाठी गेले पाहिजे. तरच एकी होईल. आजच्या रॅलीत भाजपचे नेते पुढे होते का? असा टोलाही त्यांनी लगावला.