Tue, Jun 18, 2019 21:22होमपेज › Sangli › हर्णैतील खेम धरणाच्या गळतीकडे ‘लघु पाटबंधारे’चे अक्षम्य दुर्लक्ष

हर्णैतील खेम धरणाच्या गळतीकडे ‘लघु पाटबंधारे’चे अक्षम्य दुर्लक्ष

Published On: Jul 07 2018 1:37AM | Last Updated: Jul 06 2018 8:52PMदापोली : वार्ताहर

हर्णै येथील खेम धरणाला लागलेल्या पाणी गळतीने पाण्याचा विसर्ग होऊन लाखो लिटर पाणी वाया जात आहे. धरणाच्या भिंतीतून झिरपणार्‍या पाणी गळती कामाच्या दुरुस्तीकडे मात्र लघु पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी संताप व्यक्‍त केला आहे.दापोली तालुक्यातील हर्णै गावाच्या माथ्यावर अडखळ गावाच्या हद्दीमध्ये खेम धरण आहे. या धरणाच्या भिंतीतून गेल्या काही वर्षांपासून पाणी झिरपत आहे. गेल्यावर्षी जुलै महिन्याच्या दरम्यान भिंतीतून पाणी गळतीस सुरुवात झाल्याने धरण फुटेल की काय? या भीतीने परिसरात प्रचंड घबराट निर्माण झाली होती. त्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधींनी या धरणाला भेटी देऊन पुढील पावसाळ्यापूर्वी धरणाच्या भिंतीतून होणारी पाण्याची गळती तसेच धरणातील गाळ काढण्याचे येथील ग्रामस्थांना आश्‍वासित करून प्रसारमाध्यमांद्वारे प्रसिद्धी मिळविली होती. मात्र, वर्ष झाले तरी धरण दुरुस्तीला मंजुरी काही मिळाली नाही आणि गाळही काढला गेलेला नाही.

हर्णै खेम धरणाच्या बाहेर खोदलेल्या जॅकवेलमधून हर्णै ग्रामपंचायतीमार्फत हर्णै, पाळंदे, पाजपंढरी व अडखळ या गावांना पाणीपुरवठा केला जात असून दुर्दैवाने धरणाची भिंत फुटलीच तर या नळपाणी योजनेवर परिणाम होणार आहे. धरणाखालील बाजूस असलेल्या अडखळ घागवाडी, कदमवाडी, झुंजारवाडी, जुईकर मोहल्‍ला तसेच इरफानिया मोहल्‍ला यांना पाण्याचा धोका संभावण्याची शक्यता अधिक आहे.दरम्यान, गतवर्षीच गळतीची समस्या सोडविणे व गाळ काढणे अपेक्षित होते. मात्र, तसे झाले नाही. ग्रामपंचायतीने या धरणाजवळ ग्राम पोषण पाणीपुरवठा स्वच्छता समिती हर्णै मार्फत व शासनाच्या अहवालानुसार धरणाची भिंत कमकुवत झाल्यामुळे धरणाच्या भिंतीवर कोणीही चढू अगर उतरु नये, भिंतीचे दगड, कपरी निघून अपघात होण्याची शक्यता असल्याचा सूचना फलक उभारला आहे. धरण दुरूस्तीकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.